निसर्गाचा लहरीपणा! महाराष्ट्रासह देशातील ‘या’ शहरांत पावसाची शक्यता

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : देशात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. आज धुलिवंदन असतानाही पाऊस पडत आहे आणि यानंतरही हवामानात बदल होऊन पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे.

देशाच्या राजधानी दिल्लीसह अनेक शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या दोन दिवसात मध्य आणि पश्चिम भारतात वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा – मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक भागांत ईडीची पुन्हा छापेमारी; कोट्यवधीची मालमत्ता जप्त

येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही, हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागात पश्चिमी वाऱ्यांचा अंशतः प्रभाव दिसणार आहे. यासोबतच दक्षिण कोकण आणि मध्य छत्तीसगडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मध्य भारतात हलका, मध्यम आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

तापमान कमी जास्त होण्याची शक्यता
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या १५ दिवसात भागातील कमाल तापमानावर विशेष परिणाम होणार नसला तरी महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची घट होण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी