घरमुंबईबलात्काराला विरोध केल्याने ‘त्या’ महिलेची हत्या?

बलात्काराला विरोध केल्याने ‘त्या’ महिलेची हत्या?

Subscribe

सुरतवरून मुंबईच्या दिशेने येणार्‍या दादर-भुज एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी एका ४० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. पण ज्या अवस्थेत मृतदेह आढळला होता, त्या दिशेने तपास केल्यावर अज्ञात आरोपीने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यास नकार दिल्याने अज्ञात महिलेची हत्या करून पसार झाला असा संशय रेल्वे पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास दादर-भुज एक्स्प्रेस ही रेल्वे बोरीवली स्थानकात थांबली होती. यावेळी त्या डब्यात इतर महिलासुद्धा होत्या.बोरीवली स्थानकात त्या महिला उतरल्या त्यावेळी ही महिला डब्यात एकटीच होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दादर-भुज एक्स्प्रेस बोरीवली स्थानकातून निघाल्यावर थेट दादरला थांबत असल्याने बोरीवली ते दादर दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र, या हत्येला पाच दिवस उलटून गेल्यावरही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही.

महिला सुरतवरून वडाळा परिसरात राहणार्‍या आपल्या बहिणीकडे जात होत्या. मात्र, त्या आधीच त्यांच्याबाबतीत ही दुर्घटना घडली. दादर स्थानकात रेल्वे पोहोचल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी डब्यात तपासणी करायला सुरुवात केली, तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. धारदार शस्राने त्यांचा गळा चिरण्यात आला होता आणि त्यांचा मृतदेह पूर्णपणे नग्नावस्थेत होता. त्यांच्या शरीरावर फक्त साडी टाकण्यात आली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी माथेफिरूने पहिल्यांदा त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच हत्या करण्यात आली आणि त्यांच्याकडे असणारा ऐवज घेऊन तो गायब झाला.

- Advertisement -

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. बोरीवली ते दादर दरम्यान सर्व रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असूनही कोणत्याही प्रकारचा माग लागलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -