घरमुंबईकोविड काळात BMC ने केलेले कार्य अनुकरणीय; दिल्लीत राबविणार 'मुंबई मॉडेल'

कोविड काळात BMC ने केलेले कार्य अनुकरणीय; दिल्लीत राबविणार ‘मुंबई मॉडेल’

Subscribe

दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींचा मुंबई अभ्यास दौरा

‘कोविड १९’ या साथरोगास प्रतिबंध करण्यासोबतच बाधित झालेल्या व्यक्तींना अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका अव्याहतपणे कार्यरत आहे. याबाबत लोकसंख्येच्या घनतेसह इतर अनेक आव्हाने असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कार्याची सकारात्मक दखल राज्य, देश व जागतिक ‌पातळीवर देखील वेळोवेळी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरण व सविस्तर चर्चा करून दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना बृहन्मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या सर्वस्तरीय कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली.

या दौऱ्यामध्ये दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डाॅ. संजय अगरवाल आणि डाॅ. धर्मेन्द्र कुमार यांचा प्रामुख्याने समावेश असणाऱ्या चमूने आपल्या अभ्यास दौ-यादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विविध स्तरीय कार्यवाहीची माहिती घेतली. या अंतर्गत प्रामुख्याने ‘वाॅर्ड वॉर रूम’च्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्‍यवस्‍थापन, रुग्णालयांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जंबो रुग्णालयांची माहिती घेतली. प्रत्यक्ष माहिती घेण्याच्या दृष्टीने या प्रतिनिधींनी गोरेगाव येथील महापालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयाला आणि अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तिथे करण्यात येत असलेल्या सुव्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

- Advertisement -

या अभ्यास दौऱ्याच्या अखेरीस अतिरिक्त महापालिका आयुक्त काकाणी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय चमूशी संवाद साधताना दिल्ली राज्य सरकारच्या चमूने आवर्जून नमूद केले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेले कार्य अनुकरणीय असून दिल्लीत देखील लवकरच ‘मुंबई मॉडेल’ लवकरच राबविण्यात येणार आहे.

वॉर्ड वॉर रूमचे कामकाज घेतले समजावून

दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी बृहन्मुंबई महानगरपालिका करीत असलेले कोविड रुग्ण व्यवस्थापन आणि ‘बेड अलॉटमेंट’ समजावून घेण्यासाठी ‘डी’ व ‘के पूर्व’ या दोन विभागांच्या नियंत्रण कक्षांना अर्थात ‘वाॅर्ड वॉर रूम’ना भेट दिली. ज्या व्यक्तींना कोविड बाधा झाली आहे, त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल हे सर्वप्रथम महापालिकेच्या ‘वाॅर रूम’ कडे प्राप्त होतात. त्यानंतर रुग्णांशी दूरध्वनी संवाद साधला जातो व त्यांचे प्राथमिक समुपदेशन देखील केले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार महापालिकेची चमू सदर व्यक्तीच्या घरी जाऊन आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करते. या दरम्यान सदर रुग्णास रुग्णालयात दाखल करणे वैद्यकीय उपचार क्रमानुसार गरजेचे असल्यास रुग्णाला त्याच्या गरजेनुसार खासगी वा सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले जाते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलपणे व वेळेत करण्यात येत असल्याचे पाहून; तसेच महापालिकेने ‘वॉर्ड वाॅर रूम’च्या माध्यमातून साध्य केलेली विकेंद्रित सुव्यवस्था पाहून दिल्ली राज्य सरकारची चमू भारावून गेली.

- Advertisement -

प्राणवायू व्यवस्थापन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १ हजार ८०० खाटांच्या ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयात १८ मेट्रिक टन ‘ऑक्सिजन’ पुरेसा असतो. मात्र तेवढीच खाटा संख्या असणाऱ्या १ हजार ८०० ‘बेड’च्या दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील एका रुग्णालयात दररोज ३२ मेट्रिक टन ‘ऑक्सिजन’ लागतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करून प्रभावी रुग्णसेवा कशी साध्य केली आहे, याबाबतची माहिती देखील दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय चमूद्वारे दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना प्राणवायू व्यवस्थापनाची तपशीलवार माहिती प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. यानुसार महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्राणवायू व्यवस्थापन करताना रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचार क्रमानुसार व आवश्यकतेनुसार प्राणवायूचा (Oxygen) पुरवठा करण्यात येतो. या प्राणवायू पुरवठ्याचे अत्यंत काटेकोर नियोजन व व्यवस्थापन महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये साध्य करण्यात आले आहे. याकरिता रुग्णालयांच्या स्तरावर काही परिचारिकांना प्राणवायू व्यवस्थापनाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठ्याबाबत तंत्रज्ञ देखील अव्याहतपणे कार्यरत असून ते देखील प्राणवायू पुरवठ्याबाबत काळजीपूर्वक लक्ष ठेवून योग्य ती कार्यवाही सातत्याने करीत असतात. त्याचबरोबर डॉक्टरांच्या स्तरावर देखील सुयोग्य व आवश्यक तेवढाच वापर होत असल्याची पाहणी नियमितपणे करण्यात येते.

अल्पावधीत उभारलेली जंबो कोविड रुग्णालये

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांना परिणामकारक औषध उपचार मिळावेत, या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यंत अल्प कालावधीत तात्पुरत्या स्वरूपातील ६ जंबो कोविड रुग्णालयांची उभारणी केली. या सहा रुग्णालयांमध्ये तब्बल ८ हजार ९१५ खाटा असून ४ हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ या ठिकाणी अव्याहतपणे कार्यरत आहे. या रुग्णालयांच्या उभारणीबाबत व व्यवस्थापनाबाबत दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना अत्यंत औत्सुक्य होते. या अनुषंगाने त्यांनी गोरेगाव परिसरातील नेस्को प्रदर्शन केंद्राच्या जागेत महापालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या जंबो कोविड रुग्णालयास भेट दिली. तिथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा आणि करण्यात येत असलेली विविधस्तरीय उपाययोजनांची त्यांनी तपशीलवार माहिती घेतली. तसेच सदर ठिकाणी असणारे ‘डायलिसिस बेड’, ‘आयसीयू बेड’ आणि ‘ऑक्सिजन बेड’ याबाबतही त्यांनी तपशीलवार माहिती जाणून घेतली. यानिमित्ताने नेस्को जंबो कोविड रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, लवकरच मुंबईच्या धर्तीवर दिल्लीमध्ये देखील जंबो रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.

खाजगी रुग्णालयातील ८०% खाटांचे वितरण महापालिकेकडे

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील सर्व खाटा आणि इतर खाटांपैकी ८० टक्के खाटांचे वितरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘वाॅर्ड वॉर रूम’ द्वारेच करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी प्रशंसा केली. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनी देखील या व्यवस्थेत सकारात्मक व सक्रिय योगदान दिल्याचे पाहून आपण भारावून गेलो आहोत, अशा भावनाही या चमूने अभ्यास दौऱ्यादरम्यान व्यक्त केल्या.


Mumbai rain : मुंबईकरांनो येत्या २४ तासांत पुन्हा जोरदार पाऊस !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -