देशाच्या ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला रेड अलर्ट जारी

heavy rain in mumbai
मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये नुकताच मुसळधार पाऊस झाला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारीही ढगाळ वातावरण होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील तापमानात घट झाली आहे. दिल्लीकरांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि ओडिशासह अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांतील विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने सांगितले की, वायव्य बंगालच्या उपसागर, ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे जवळपासच्या अनेक राज्यांच्या हवामानात बदल होणार आहे. भुवनेश्वर हवामान केंद्राने सांगितले की, पुढील ४८ तासांत ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने सांगितले की, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, दिल्ली-एनसीआर सारख्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आपल्या ताज्या हवामान अंदाजात, IMD ने म्हटले आहे की ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पुढील 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात रेड अलर्ट –

IMD ने पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सातारा यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. IMD ने पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया आणि वाशीमसह महाराष्ट्रातील काही भागांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता –

बंगालमध्ये 9 आणि 10 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दक्षिण 24 परगना आणि पुरबा मेदिनीपूरच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर गंगेच्या पश्चिम बंगालच्या इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दिल्लीत पाऊस –

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवसा दिल्लीत अनेक ठिकाणी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

 राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट –

राजस्थानमध्ये हवामान खात्याने पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने अजमेर, भिलवाडा, बुंदी, चित्तोडगड, डुंगरपूर, झालावाड, कोटा, प्रतापगड, सवाई माधोपूर, सिरोही, टोंक, उदयपूर आणि पाली जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.