घरमुंबईराज्यातील मनसेची पहिली शाखा असलेल्या शहापुरात उमेदवार नाही

राज्यातील मनसेची पहिली शाखा असलेल्या शहापुरात उमेदवार नाही

Subscribe

विधानसभेतून माघार घेतल्याने कार्यकर्ते नाराज

शहापूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीतुन माघार घेतली आहे. निवडणूक न लढविण्याचा निर्णय मनसेने अचानक का घेतला याबाबत आश्चर्य येथे व्यक्त होत असून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेची स्थापना झाल्यावर राज्यभरात मनसेच्या स्थानिक शाखा कार्यालये स्थापन करण्यात आली. त्यातील पहिले कार्यालय शहापूरमध्ये सुरू करण्यात आले होते. स्वतः मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. या ठिकाणी राज ठाकरे यांची वादळी सभाही झाली होती. मात्र, याच ठिकाणी मनसेने विधानसभेसाठी उमेदवार न दिल्यामुळे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

शहापुरात मनसेने ग्रामपंचायत ते पंचायत समितीपासून ते ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत तुल्यबळ असे उमेदवार उभे करीत निवडणुका लढविलेल्या आहेत. यापूर्वी 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी नवनिर्माण सेनेतून ज्ञानेश्वर तलपाडे यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी 18 हजारांचे मताधिक्य मनसेला मिळाले होते. 2014 साली मात्र मनसेची पडझड सुुरू झाली. ती पडझड अजूनही सुरूच असून त्यानंतर मनसे या भागात कमकुवत झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूर मनसेने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मनसेच्या शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत माजे यांनी सांगितले की, आमच्याकडे चार इच्छुक उमेदवार होते. मात्र, अर्थिक चणचण असल्याने या निवडणुकीतील खर्च मनसेला झेपणार नसल्याचे कारण त्यांनी दिले. मात्र, निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी झुंज देत घाम फोडणार्‍या मनसेने असे शांत बसणे योग्य नसल्याचे मत येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शिवसेना उमेदवाराच्या सोयीसाठी मनसेने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसेच्या निवडणूक न लढविण्याच्या भूमिकेमुळे आता शिवसेना व राष्ट्रवादी या दोनच पक्षांंत लढत येथे होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -