घरमुंबईगद्दारांना शिवसेनेत जागा नाही

गद्दारांना शिवसेनेत जागा नाही

Subscribe

नाराज आमदारांना उद्धव ठाकरेंचा इशारा, विधान परिषद निवडणुकीत फाटाफुटीची शक्यता फेटाळली

उद्याच्या निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. शिवसेनेत आता कुणीही गद्दार राहिला नाही. कितीही फाटलं तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच मागे एकदा फाटाफूट झाली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. तो आज काय उद्यासुद्धा मला नको आहे. अनेकांनी शिवसेना मोठी केली, पण त्यांना हे बघायला मिळाले नाही, आपल्याला मिळतेय. राज्यसभा निवडणुकीत मत फुटलेले नाही. विधान परिषदेतही फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदारांना सुनावले, तर कुणी काय कलाकार्‍या केल्या हे कळाले आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.

महाराष्ट्रातील शहाणी जनता आपल्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालू देत नाही. शेराला सव्वाशेर मिळतोच, असे सांगत त्यांनी भाजपवरदेखील हल्ला चढवला. शिवसेना आमदारांना ठेवण्यात आलेल्या पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात रविवारी शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्थापनेवेळच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले की, माझा पक्ष हा पितृपक्ष आहे. कारण माझ्या पित्याने हा पक्ष स्थापन केला होता. शिवसेनेच्या स्थापनेवेळी माझे वय ६ वर्षे होते. शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ आणि आम्ही तीन मुले होतो. तेव्हा वेळकाळ, दिवस न बघता शिवसेनेची स्थापना करण्यात आली. शिवाजी महाराज की जय म्हणून शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फुटला. त्या नारळाच्या पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले. तेव्हा जोश होता, गंमत होती. तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते की ते शिंतोडे मला इतके भिजवतील. फार मोठी जबाबदारी आहे हे तेव्हा कळालेच नाही.

शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेनेचे काय, हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, त्याला आपण नुसतेच नाही तर कणखरपणे उत्तर देत आलो आहोत. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१मध्ये होणे हेच खूप मोठे वैभव होते. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. मंत्रिपद आपल्याकडे आहे. ५६ आमदार आहेत. अनेकांनी शिवसेना मोठी केली, पण त्यांना हे वैभव भोगता आले नाही. उद्धव ठाकरेला किंमत नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेला महत्त्व आहे. जीवाला जीव देणारा सैनिक लाभला हे माझे भाग्य आहे. धाडसाला मरण नसते. धाडस हा आपला स्थायीभाव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आणीबाणीसारखा काळ पाहिला आहे. विरोधी पक्ष तेव्हा हतबल होता. आता आपण मजबूत आहोत. हिंदुत्वाचे डंके पेटताहेत. तेव्हा बोलायला कोणी नव्हते. आज जे चाललेय ते हिंदुत्व त्यांच्यासाठी असेल. माझ्यासाठी हिंदुत्व वेगळे आहे. अग्निपथमुळे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात हवे. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच आहेत. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही. शेतकरी कायद्यावर हटून बसल्यानंतर एक पाऊल मागे घ्यावे लागले. आपण का टिकलो, तर आपण जे वचन दिले ते पाळले. अचानक योजना आणायची, अग्निवीर नाव द्यायचे, पण शिकवणार काय? चार वर्षांनी त्यांच्या नोकरीचा पत्ता नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले.

सुभाष देसाई, दिवाकर रावतेंचे कौतुक
शिवसेनाप्रमुखांचे दोन्ही साथी, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना पावला पावलावर साथ दिली. मी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही. तरी कुठेही धुसफूस, रुसवेफुगवे न दाखवता दोघेही त्याच उत्साहाने मंचावर आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्यासाठी कौतुकोद्गार काढले.

आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणे हीच लोकशाही
उद्धव ठाकरे यांनी हॉटेल पॉलिटिक्सवरही भाष्य केले. नाही म्हटले तरी आमदारांची बडदास्त ठेवावी लागते. यालाच आजची लोकशाही म्हणत असल्याचेही त्यांनी खोचक शब्दांत सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -