Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसविरहित तिसरी आघाडी?

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसविरहित तिसरी आघाडी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात बंद दाराआड तीन तास चर्चा झाली.

Related Story

- Advertisement -

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसविरहित तिसरी आघाडी करण्याच्या हालचालींना सुरूवात झाली असून यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात बंद दाराआड तीन तास चर्चा झाली. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते.

प्रशांत किशोर हे शुक्रवारी अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांना भेटायला आले. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तीन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याने ही सदिच्छा भेट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय जयंत पाटीलही या चर्चेत सहभागी होण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याने ही भेट निव्वळ राजकीय असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आगामी विधानसभा निवडणुका आणि पालिका निवडणुका या पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय स्ट्रॅटेजी असावी याची पाटील यांनाही माहिती असावी यासाठी पाटील यांना तातडीने सिल्व्हर ओकवर बोलावून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोना संकटामुळे बदललेली राजकीय परिस्थिती आणि नागरिकांची मानसिकता याविषयीही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत राज्यात आणि महाराष्ट्रात बंगाल मॉडेल लागू करता येऊ शकते का? तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात किंवा राज्या राज्यांमध्ये लागू होऊ शकते का? कोणत्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे मॉडेल लागू होऊ शकते? त्यासाठी विरोधी विचारधारा असलेले कोणते राजकीय पक्ष जवळ येऊ शकतात, यावरही चर्चा होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी नेतृत्व करावे की ममता बॅनर्जी यांनी, यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रशांत किशोर यांनी बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर संन्यास घेतला आहे. मात्र, देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे मानले जाणारे शरद पवार यांची प्रशांत किशोर यांनी भेट घेतल्याने भुवया उंचावल्या जात आहेत. शरद पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनी निवडणुकांबद्दल भाष्य केले आहे. या भाषणात पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व आहे.

- Advertisement -