डोंबिवलीत १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज; देशात तिसऱ्या स्थानी!

डोंबिवलीमध्ये तब्बल १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. उंचीच्या बाबतीत देशात हा तिसरा ध्वजस्तंभ ठरणार असून राज्यात त्याचा दुसरा क्रमांक लागेल.

indian flag

गेल्या ६९ वर्षांपासून देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये देशाच्या अनेक भागांत राहाणारे भारतीय वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देत असतात. यावर्षी जिथे एकीकडे राजधानी दिल्लीत राजपथावर दरवर्षीप्रमाणे पथसंचलन होणार असून त्याच वेळी मुंबईच्या जवळच म्हणजेच डोंबिवलीमध्ये तब्बल १५० फुटांचा तिरंगा उभा राहणार आहे. उंचीच्या बाबतीत हा तिरंगा देशात तिसऱ्या तर महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानी असेल. विशेष म्हणजे डोंबिवलीतल्या एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीने या चंग बांधला असून त्यासाठी डोंबिवलीत २ एकर उद्यानाची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे.

कसा असेल हा ध्वज?

डोंबिवलीजवळच्या भोपर- देसले पाड्यातील लोढा हेरिटेज को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या वतीने यंदाचा प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीवने साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी डोंबिवलीजवळच तब्बल १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. त्यावर २० फूट उंची आणि ३० फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात पुण्यात आणि देशात वाघा बॉर्डर येथे सर्वात उंच झेंडा उभारण्यात आला आहे. त्यानंतर आता डोंबिवलीत हा झेंडा फडकवला जाणार आहे. ‘येत्या २५ जानेवारीला दुपारी अडीच वाजता ८ गोरखा रायफल्सचे कर्नल आर. सी. देशपांडे यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचं अनावरण होणार आहे’, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष नासीर खान यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

Flag Rod

झेंड्याचा स्तंभ कोलकाताहून येणार!

लोढा हेरिटेज या परिसरात एकूण १३ सोसायट्या असून १२५० कुटुंब राहतात. लोढा हेरिटेज सोसायटीच्या सुमारे २ एकर गार्डनमध्ये दीडशे फूट ध्वज स्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. कोलकाता येथील आकाश एंटरप्राईजेस कंपनीला हा दीडशे फूट उंचीचा पोल उभारण्याचे काम देण्यात आले असून सध्या हे काम सुरू आहे. या पोलचा पाया १६ फूट खोल घेण्यात आला आहे. झेंडा उभारण्याच्या कामासाठी साधारण २५ लाख रूपये खर्च येणार आहे. सोसायटीच्या फंडातूनच हा खर्च करण्यात येणार असल्याचे नासीर खान यांनी सांगितले. डोंबिवलीतील प्लॅग कंपनीतून ५० फूट झेंडा बनवून घेण्यात आला आहे.

सर्व नियमांची अंमलबजावणी!

आपल्या देशाचा राष्ट्रध्वज बनवण्याची आणि फडकवण्याची काही विशिष्ट अशी नियमावली आहे. झेंडा ९९ फूट असेल तर झेंडयाला खाली उतरवावे लागते. पण शंभर फूटाच्या वर असेल तर कायम स्वरूपी फडकता झेंडा असतो. तो खाली उतरवण्याची गरज नसते. जर तो फाटला अथवा खराब झाला तर उतरवून दुसरा लावणे किंवा तो स्वच्छ करून लावणे असं करता येऊ शकतं. शिवाय झेंडा कायम प्रकाशझोतात ठेवावा लागतो. त्यासाठी दीडशे फुटांवर फोकस लावण्यात आला आहे. त्यासाठी जनरेटरचीही सोय करण्यात आली आहे. कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी इथे करण्यात आली आहे. तसेच, त्याची देखभाल कोण करणार? जबाबदार व्यक्ती कोण आहे? यांचं जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलिसांना अॅफिडेव्हिट द्यावं लागतं. त्या सगळया गोष्टी केल्या आहेत, असं खान यांनी सांगितलं.