घरमुंबईठाण्यातून अडीच हजार किलो प्लास्टिक जप्त

ठाण्यातून अडीच हजार किलो प्लास्टिक जप्त

Subscribe

सरकारने २३ जूनपासून प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कठोर कारवाईमध्ये जवळपास २५०० किलो इतके प्लास्टिक जप्त करण्यात आले असून अंदाजे ९५ हजार रूपयांचा दंड वसूल केला.

राज्य शासनाने प्लास्टिकविरोधात घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कठोर कारवाईमध्ये जवळपास २५०० किलो इतके प्लास्टिक जप्त करण्यात आले असून अंदाजे ९५ हजार रूपयांचा दंड वसूल केला. दरम्यान महापालिकेच्यावतीने सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्रे तसेच प्लास्टिक संकलन वाहनाच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन करण्यात येत असून नागरिकांना त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. सरकारने २३ जूनपासून प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक यांच्या पथकांनी कडक कारवाई केली. या कारवाईमध्ये १०० पेक्षा जास्त दुकानदार व विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या व्हाटस् अ‍ॅप क्रमांकावर जवळपास ७५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावरही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कारवाईमध्ये जमा झालेले जवळपास २५०० किलो प्लास्टिक महापालिकेच्या सुका कचरा संकलन केंद्राच्या माध्यमातून नियमानुसार पुनर्चक्रीकरण करण्यात येणार आहे तसेच त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. प्लास्टिक वस्तूंना पर्यायी वस्तूंची माहिती व सदर वस्तू पुरविणारे उत्पादक व पुरवठादार यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केडीएमसीचे १०० अधिकारी तैनात

शनिवारी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानात धाडी टाकत केडीएमसीने प्लास्टिक जप्त करण्याची कारवाई सुरु करून दंडही वसूल केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी दहा प्रभागांत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली १० पथके तयार केली अली असून, या प्रत्येक पथकात १० कर्मचारी आहेत.

- Advertisement -

दंडाच्या रकमेस मनसेचा विरोध

प्लास्टीक बंदी विरोधात कारवाई सुरू असतानाच पाच हजार रूपये दंडाच्या रकमेस मनसेने विरोध दर्शविला. शासनाला प्लास्टीक बंदी लागू करायची असेल तर प्लास्टीक बनवणाऱ्या कारखान्यांवर बंदी आणावी. सर्वसामान्य जनतेला बळीचा बकरा करू नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शाखेने दिला. प्लास्टीक बंदीला विरोध नाही मात्र ५ हजार रूपयांचा दंड देण्याची ताकद सामान्य मराठी माणसाची नाही, म्हणून कोणाकडे दंड मागितल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मनसेचे अविनाश जाधव यांनी नागरिकांना केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -