घरमुंबईMy Mahanagar च्या प्रतिनिधीला धमकी : विविध पत्रकार संघटनांकडून निषेध, काँग्रेसचे मात्र...

My Mahanagar च्या प्रतिनिधीला धमकी : विविध पत्रकार संघटनांकडून निषेध, काँग्रेसचे मात्र मौन

Subscribe

मुंबई : ‘My Mahanagar’चे पत्रकार स्वप्निल जाधव (Swapnil Jadhav) यांना काल, सोमवारी वांद्रे पूर्व येथील कॉंग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी ‘हात तोडून हातात देईन’ या दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनसह मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने जाहीर निषेध केला आहे. मात्र, या घटनेबाबत काँग्रेसने मात्र मौन बाळगले आहे. ना मुंबई काँग्रेस, ना प्रदेश काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Threat to representative of My Mahanagar : Protest by various journalist organizations, silence of Congress)

‌भाजपा खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत महिला कुस्तीपटूंनी नवी दिल्लीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी सोमवारी मुंबईतील मंत्रालयानजीकच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. My Mahanagarसाठी स्वप्निल जाधव याचे लाइव्ह वार्तांकन करत असताना हा प्रकार घडला. याबाबत मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

‌आमदार सिद्दिकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

My Mahanagarचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी हात तोडण्याच्या दिलेल्या धमकीचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने तीव्र निषेध केला आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी वार्ताहर संघाने केली आहे. या मागणीसाठी संघाच्या वतीने आज, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. शिवाय, झिशान सिद्दीकी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याची मागणी संघ प्रतिनिधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन करणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो यांनी सांगितले.

तसेच टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने (महाराष्ट्र) देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आमदार सिद्दीकी यांनी माफी मागवी अन्यथा पत्रकार संघटना आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विनोद जगदाळे आणि सचिव राजेश माळकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

सिद्दीकी यांनी तत्काळ माफी मागावी

लोकप्रतिनिधी असूनही आमदार सिद्दीकी यांचे हे वागणे अशोभनीय असल्याचे सांगत, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने पत्रकाराला धमकी देण्याच्या सिद्दीकी यांच्या कृतीचा जाहीर निषेध केला आहे. ‘आमदार झिशान सिद्दीकी यांनी या गोष्टीबद्दल माफो मागावी, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (MIA) वतीने करत आहोत. पत्रकार स्वप्निल जाधव याच्यासोबत आम्ही आहोत,’ अशी स्पष्ट भूमिका एमएआय संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी घेतली आहे.

मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशनकडून निषेध

महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर My Mahanagarचे पत्रकार स्वप्निल जाधव काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घेत होते त्यावेळी आमदार झिशान सिद्दीकी यांनी लाइव्हदरम्यान मधे हात टाकून रोखण्याचा प्रयत्न केला. लाइव्ह सुरू असल्याने स्वप्निल जाधव यांनी त्यांचा हात बाजूला केला, या गोष्टीचा राग मनात धरून लाइव्ह संपल्यानंतर स्वप्नील यांना आमदार झिशान सिद्दीकी यांनी ‘पुन्हा अस केलंस तर हात तोडून हातात देईन’ अशी धमकी दिली. लोकप्रतिनिधी असूनही सिद्दीकी यांचे हे वागणे अजिबात शोभनीय नाही. पत्रकाराला अशी धमकी देणाच्या सिद्दीकी यांच्या कृतीचा मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशन जाहीर निषेध करत आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी आम्ही क्राइम असोसिएशनतर्फे करत आहोत. पत्रकार स्वप्निल जाधव याच्या पाठीशी आम्ही आहोत, असे संघटनेने स्पष्ट केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध

स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मराठी पत्रकार परीषदेच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन दोषीवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांची भाषा गुंडगिरीची असून संतापजनक आणि निषेधार्ह आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवावा. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केली असल्याचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे सोयीस्कर मौन

या घटनेबाबत सर्व थरांतून निषेध व्यक्त केला जात असला तरी, लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने याबाबत मौन बाळगले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडे पत्रकाराला धमकी दिल्याबाबत विचारणा केली असता, आपण असे बोललोच नाही, असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -