मुंबई : आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या दादर येथील टोरेस कंपनीच्या तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. यात कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार यांचा समावेश आहे. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी स्थानिक न्यायालयाने सोमवार, 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अजून सात ते आठजणांना आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. (three arrested in multi-crore torres scam case; fraud of millions of investors)
गुंतवणुकीवर दर आठवड्याला 10 टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सोमवारी शेकडो गुंतवणूकदारांनी मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मीरा-भाईंदर कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.
या कंपनीने गुंतवणुकदारांची तब्बल 13 कोटी 48 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार झाली असली तरी फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दादर येथे टोरेस (प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीची एक शाखा असून या कंपनीच्या मुंबईसह इतर शहरातही शाखा आहेत.
कंपनीने सुरुवातीला मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केलयावर त्यावर गुंतवणूक केल्यास दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर विविध आकर्षक योजना सुरू करून अनेकांना या योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. अनेकांना व्याजदराची रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. गुंतवणूकदारांनी इतरांनाही गुंतवणुकीस प्रवृत्त केल्यास मोठ्या रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाने कंपनीत गुंतवणूकदारांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती.
गेल्या वर्षभरात दादर येथील शाखेत जवळपास एक लाखाहून अधिक गुंतवणुकदारांनी कंपनीच्या विविध योजनेत गुंतवणूक केली होती. हाच आकडा 13 कोटी 48 लाख रुपये इतका आहे. सुरुवातीला मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिल्यानंतर कंपनीने काही दिवसांपासून पैसे देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच अनेक गुंतणुकदारांनी कंपनीच्या विविध शाखेत गर्दी केली होती. यावेळी कंपनीचे संचालकासह इतर पदाधिकारी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातून दादरच्या शाखेत अनेक गुंतवणूकदारांनी मोर्चा काढून तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रदीपकुमार मामराज वैश्य या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच संबंधित मुख्य आरोपी मुंबईहून इतर राज्यात आणि नंतर विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कंपनीच्या संचालक अजय सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली.