मुंबई : या महिन्याच्या सुरुवातीला बोरिवलीत 30 लाख रुपयांची घरफोडी झाली. या घरफोडीप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सलीम मोहम्मद हबीब कुरेशी ऊर्फ मुन्ना, इसरार अहमद अब्दुल सलाम कुरेशी आणि अकबरअली यादअली शेख ऊर्फ बाबा अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांतील 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (three arrested including main accused in burglary; more than 215 house burglaries registered against the accused)
मोहम्मद सलीम हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह देशभरातील विविध पोलीस ठाण्यात 215 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 3 नोव्हेंबरला बोरिवलीतील एका व्यावसायिकाच्या घरी चोरी झाली. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल चोरी करत पलायन केले. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बोरिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – Suicide : तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा; डॉक्टर पित्याच्या प्रयत्नांना दहा महिन्यानंतर यश
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश कदम, इंद्रजीत पाटील, सावंत, बहिराम, जाधव, शेख, लहांगे, भोये, फर्डे, झिरवा, राणे, पाटील यांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन रायगडच्या खालापूर टोलनाका परिसरातून मोहम्मद सलीमला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या चौकशीत त्याने आणखी दोघांची नावे सांगितली. त्यानंतर या पथकाने अकबरअली आणि इसरार या दोघांना पोलिसांनी बोरिवली आणि उत्तरप्रदेशच्या नोएडा येथून ताब्यात घेतले.
या तिघांकडून पोलिसांनी चोरीचा 346 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे, हिरेजडीत दागिने, गुन्ह्यांतील कार आणि सोने गाळण्याचे इतर साहित्य असा 20 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात मोहम्मद सलीम हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पुण्यासह तेलंगणा, गुजरातच्या सुरत आणि राजकोट, जयपूर, नाशिक आणि मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यात 215 घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मोहम्मद सलीम हा मूळचा हैद्राबादचा रहिवाशी असून घरफोडीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्य टोळीचा म्होरक्या आहे. इसरार हा उत्तरप्रदेश तर अकबरअली हा वडाळ्याचा रहिवाशी आहे. त्याचे अकबरअली आणि इसरार हे सहकारी असून चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी तो त्यांच्यावर सोपवत होता. मोहम्मद सलीमने बोरिवलीपूर्वी आंधप्रदेशच्या गुंटूरच्या पठ्ठाभीपुरम पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेने या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. (three arrested including main accused in burglary; more than 215 house burglaries registered against the accused)
हेही वाचा – Accident News : दारु पिऊन मौजमजा जीवावर बेतली; भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
Edited by : Ashwini A. Bhatavdekar