रुग्णालयाच्या चुकीमुळे तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोना; रुग्णालय केले सील

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

three day child corona suspected in chembur due to private hospital careless
रुग्णालयाच्या चुकीमुळे तीनदिवसाच्या बाळासह आईला कोरोना

चेंबूर येथील एका रुग्णालयातील तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही लागण कोणामुळे झाली हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात एक व्यक्ती ऍडमिट होता. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यानंतर त्याला त्या रुग्णालयातून हलवण्यात आले. मात्र, या रुग्णलयात निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार केले गेले. दरम्यान, या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्येच निर्जंतुकीकरण न करताच एका प्रसूती होणाऱ्या महिलेला त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्या महिलेला सिझेरियनद्वारे बाळ देखील झाले आणि त्या दरम्यानच त्या महिलेस बाळाला कोरोनाची लागण झाली. रुग्णालयाच्या या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून या रुग्णालयातून कोरोनाचा प्रसार झाल्याने तसेच कोरोनाच्या रुग्णाची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली नसल्याने या रुग्णालयाला सील करण्यात आले आहे.

दरम्यान, या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तसेच पुढील काही दिवस हे रुग्णालय बंदच राहणार आहे. तसेच, कोरोनाची लागण झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळाला कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे या महिलेच्या पतीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

कायदेशीर कारवाई केली जाणार

कोरोना रुग्ण असलेल्या ठिकाणी इतर रुग्णांना ठेवून त्यांच्यावर उपचार केले गेले आणि त्यामुळे इतरांना कोरोनाची लागण झाली. तर त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – धक्कदायक! चेंबूरमध्ये तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोना