मॉर्निंग वॉकला गेला म्हणून मित्राला मारहाण

deoria father beaten death due to daughter molestation complain

सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका व्यापार्‍याला त्याच्या तीन मित्रांनीच चोप देऊन त्याचा पाय फ्रॅक्चर केला. कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मॉर्निंग वॉकला सुद्धा बंदी करण्यात आली आहे. असे असताना सुद्धा तू बाहेर फिरत आहेस, असा सवाल विचारून व्यापार्‍याच्या तीन मित्रांनी त्याला शिवीगाळ करून नंतर मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे कोरोनाच्या भीतीने मित्रांच्या मैत्रीवरही प्रभाव टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. नातेसंबंध, मैत्रीवर कोरोनाची भीती मात करत असल्याचे या घटनेने समोर आणले आहे.

उल्हासनगर एक येथील भारत चौक परिसरात मनोज हौसिंग सोसायटीमध्ये राहुल हरी केसवानी (32) हा व्यापारी राहतो. मंगळवारी पहाटे 4.45 वाजताच्या सुमारास राहुल त्याच्या घराजवळ असलेल्या 24 नंबर शाळेजवळून मुख्य रस्त्याने मॉर्निंग वॉक आटोपून घरी येत होता. याच वेळी त्याचे मित्र सागर, नितीन आणि त्याचा मामा हे रस्त्यात उभे होते. राहुलला बघून त्यांनी विचारले की शहरात कोरोना वाढत असताना तू खुशाल मॉर्निंग वॉक करीत आहेस. हे नियमांच्या विरुद्ध आहे, असे म्हणून त्याला शिवीगाळ करू लागले. यावर राहुल त्यांना म्हणाला की तुम्हाला काय करायचे आहे.

यावर संतप्त झालेल्या सागर, नितीन आणि मामा यांनी राहुलला कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. त्यामुळे तो जमिनीवर पडला. पुढे आरोपींनी जमिनीवर पडलेल्या राहुलच्या पायावर मोठा दगड मारल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

या प्रकरणी राहुलने उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी सागर, नितीन आणि मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.