सांताक्रूझ येथे भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक; दोन जण जखमी

सांताक्रूझ (पश्चिम), एस. व्ही.रोड, आशा पारेख रुग्णालयाजवळील भागात तळापासून तीन मजली दुकाने आहेत. या दुकानावरील भागात रॉयल हॉटेल आहे

आगीत फरसाण, प्लंबर, रंगाचे दुकान अशी तीन दुकाने जळून खाक झाली आहेत

मुंबई : सांताक्रूझ (पश्चिम) एस. व्ही. रोड येथील रॉयल हॉटेलच्या खालील भागातील फारसाणच्या दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत लोकेश शर्मा (४५) व शहा (७४) हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ (पश्चिम), एस. व्ही.रोड, आशा पारेख रुग्णालयाजवळील भागात तळापासून तीन मजली दुकाने आहेत. या दुकानावरील भागात रॉयल हॉटेल आहे. गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानात व्यवसाय चालू असताना
या दुकानांमधील एक फरसाणच्या दुकानात अचानकपणे आग लागली. ही आग हळूहळू भडकली. या आगीत फरसाणच्या दुकानातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुकानातील कामगारांनी व मालकांनी सुरक्षिततेसाठी दुकानाच्या बाहेर धाव घेतली. तर रॉयल हॉटेलमध्येही खळबळ उडाली.
दरम्यान, या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर इंजिन, वॉटर टॅंकर यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य चालू केले.
या आगीमुळे फरसाणच्या दुकानातील लोकेश शर्मा (४५) हे भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आणखीन एक व्यक्ती चंद्रकांत साह (७४) यांना धुराची बाधा होऊन श्वास घेण्यास त्रास झाला व ब्लिडिंग सुरू झाल्याने त्यांना नजीकच्या सूर्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सदर आगीत फरसाण, प्लंबर, रंगाचे दुकान अशी तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. तर आणखीन एका दुकानालाही आगीची काही प्रमाणात झळ बसली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी एस. व्ही. रोड वरील वाहतूक थांबवून दीड तासात आगीवर फायर इंजिन आणि वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविल्यावर एस. व्ही.रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

घटनास्थळी माजी नगरसेविका हेतल गाला मदतीला
भाजपच्या माजी नगरसेविका हेतल गाला यांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटस्थळी धाव घेतली. या आगीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, सायंकाळच्या सुमारास फरसाणच्या दुकानात आग लागली होती. या आगीत दोघेजण जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आगीवर नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे व पालिकेचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत आहेत.