Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई शहापुरात बिबट्याशी थरारक झुंज

शहापुरात बिबट्याशी थरारक झुंज

जिगरबाज मायलेकींनी प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले

Related Story

- Advertisement -

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या टाकीपठारच्या जंगलात बिबट्याने हल्ला केल्याने एक १२ वर्षांचा आदिवासी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या जखमी झालेल्या मुलाने आणि त्याच्या आई आणि लहान बहिणीने बिबट्याला न घाबरता मोठ्या धाडसाने बिबट्याबरोबर जंगलात दोन हात केले. हल्लेखोर बिबट्याचा ताकदीने प्रतिकार करीत त्याच्याबरोबर प्रखर अशी झुंज या तिघा माय लेकरांनी दिली. बिबट्याच्या या जीवघेण्या हल्ल्यातून अगदी सहीसलामत आपल्या मुलाला वाचविले आणि बिबट्यास जंगलात माघारी पळवून लावले. या जिगरबाज आदिवासी मायलेकींच्या या धैर्यशील कामगिरीचे शहापूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील किन्हवली जवळील आंबेखोर परिसरातील कवठेवाडीतील गुरुनाथ कमळू कवठे हा १२ वर्षांचा मुलगा आपली आई प्रमिलाबाई व ८ वर्षीय लहान बहीण प्राची ही तीनही माय लेकरं, दाट जंगलात दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास कच्ची करवंदे आणि कैर्‍या हा रानमेवा गोळा करण्यासाठी गेले होते. याचवेळी तेथे झाडीत दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने गुरुनाथ या लहान मुलावर झडप घातली व त्यास पंजा मारुन जबर जखमी केले.

- Advertisement -

गुरुनाथ रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी आई आणि बहिणीला बोलवू लागला आपल्या मुलावर बिबट्याने हल्ला चढविल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता या या दोघा मायलेकींनी जोरात आरडा ओरडा करीत आपल्या जीवाची तमा न बाळगता जवळच पडलेली झाडाची फांदी उचलून बिबट्यावर चाल केली. मुलाची सुटका करण्यासाठी त्यास कडाडून प्रतिकार केला आणि बिबट्यावर दगडांचा एकच मारा केला. या अनपेक्षितपणे झालेल्या प्रतिहल्ल्याने बिबट्या भेदरला अन् तो गुरुनाथला तेथेच टाकून जंगलात पळून गेला.

माय लेकीने बिबट्याच्या हल्यातून बारा वर्षीय गुरुनाथची अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गुरुनाथच्या कपाळावर तसेच उजव्या गालावर आणि डाव्या हातावर बिबट्याची नखे लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाच्या आंबेखोर बीटचे वनरक्षक उमेश आव्हाड व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुरुनाथला तातडीने उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तथापि जखमी मुलाची प्रकृती आता स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे टाकीपठार परिसरातील जंगलपट्ट्यातील हिवाळा, उंबरवाडी, फणसवाडी, करपटवाडी, आंबेखोर, मानेखिंड, आपटे, कवठेवाडी, नामपाडा या भागातील आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या या दहशतीने एकच घबराट पसरली असून बिबट्या हल्ला करेल या भीतीने येथील गाव पाड्यांवरील आदिवासी हे रात्री झोपतच नसून ते जागता पहारा देत आहेत.

- Advertisement -

बिबट्याच्या हल्ल्याच्या या दुर्दैवी घटनेनंतर वन विभाग सर्तक झाले आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जंगलात एकट्याने फिरु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तातडीने घटनास्थळी जंगलात दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गरज पडल्यास जंगलात पिंजरे देखील लावले जातील.
– संदीप तोरडमल, वनपरिक्षेत्र अधिकारी (धसई ) शहापूर

हाली बरफच्या धाडसाची आठवण
अशाच प्रकारे पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील तानसा अभयारण्यालगत असलेल्या नाांंदगावच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या दोघी बहिणींवर बिबट्याने हल्ला चढविला होता. यावेळी बिबट्याबरोबर समोरा समोर सामना करुन आपल्या लहान बहिणीची बिबट्याच्या जबड्यातून हाली बरफ या लहान मुलीने सुरक्षित सुटका केली होती. अगदी तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती शहापुरात पुन्हा घडली आहे.

- Advertisement -