घरमुंबईठाणे पालिका रुग्णालयात क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा

ठाणे पालिका रुग्णालयात क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा

Subscribe

क्षयरुग्णांची पालिकेवर धडक

ठाणे महापालिकेकडून क्षय रुग्णांसाठी औषधे पुरवली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी क्षय रुग्णांसमवेतच महापालिकेवर धडक दिली. क्षय रुग्णांना घेऊनच सभागृहाबाहेर निदर्शने केली. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये क्षय रोगाची औषधे पुरविण्यासाठी दोन दिवसात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

महापालिकेच्या रुग्णालयात क्षय रोगाच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. एकिकडे रूग्णालयात हेलपाटे मारून रूग्ण खूपच कंटाळले आहेत. तर दुसरकडे वेळेत औषध मिळत नसल्याने प्राथमिक श्रेणीतील रुग्णांचा आजारही बळावला आहे. मुंब्रा कौसा परिसरातील नगरसेवक शानू पठाण यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे औषध उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली हेाती. मात्र तरीसुद्धा औषधे उपलब्ध न झाल्याने शुक्रवारी क्षय रूग्णांना घेऊनच नगरसेवक पठाण यांनी महासभेवर धडक दिली. त्यांनी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाबाहेरच जोरदार निदर्शने केली. 24 जून 2019 रोजी केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून क्षयरोगाच्या औषधांचा पुरवठा राज्यपातळीवर करण्यासाठी सूचित केले आहे.

- Advertisement -

त्याप्रमाणे राज्य सरकारनेही 28जून 2019 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना औषध खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र एक महिना उलटूनही क्षयरोगाची औषधे खरेदी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रूग्णांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. असे पठाण यांनी सांगितले. पठाण यांनी आयुक्त जयस्वाल यांची भेट घेत क्षयरुग्णांची अवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर दोन दिवसांत औषधांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी नगरसेविका फरझाना शाकीर, आशरीन राऊत, शाकीब दाते, शाकीर शेख आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -