घरमुंबईपर्यावरणपूरक सण साजरे करण्याबाबतची सह्याद्री अतिथीगृहावरील आजची बैठक गाजणार

पर्यावरणपूरक सण साजरे करण्याबाबतची सह्याद्री अतिथीगृहावरील आजची बैठक गाजणार

Subscribe

मुंबई : देशातील, राज्यातील सण व उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी केंद्र व राज्य शासन आग्रही आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशामुळे मुंबई महापालिकेलाही पर्यावरणपूरक सण साजरे करण्याबाबत भूमिका घ्यावी लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या आदेशाने आज (17 मे) सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Guest House) दुपारच्या सुमारास सदर विषयावर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत गणेशोत्सवात पीओपी ऐवजी शाडू मातीच्या मूर्तींबाबतचा पर्याय (Alternative to Shadu clay idols instead of POP) ठेवण्यात येणार आहे. मात्र त्यास बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार व गणेश मंडळांकडून आक्षेप घेतला जाण्याची व त्यामुळे बैठक वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण की, पर्यावरणपूरक सण व उत्सव यासाठी केंद्र, राज्य शासन व महापालिका प्रशासन गेल्या वर्षीपासून जास्त प्रयत्नशील आहेत. मात्र सध्या तरी गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार व गणेश मंडळे यांची सकारात्मक मानसिकता नाही. त्यामुळेच 1 मार्च रोजी मुंबई महापालिकेच्या परळ येथील पालिका कार्यालयात सदर वादग्रस्त विषयावर आयोजित बैठकीत पीओपी मूर्तीला ठोस पर्याय न दिल्याने गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार व गणेश मंडळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे बैठकच निष्फळ ठरली होती. त्यामुळेच आता राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आयोजित केलेली सदर विषयावरील बैठकही वादळी आणि निष्फळ ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही बैठक प्रत्यक्षात सुरू झाल्यावरच कोणाचे काय सूर आहेत, त्याला कोणाचा कितपत सकारात्मक व नकारात्मक प्रतिसाद लाभतोय आणि एकूणच महत्वपूर्ण बैठकीत नेमका काय निर्णय होणार हे पाहावे लागेल.

- Advertisement -

वास्तविक, मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मुंबईत जवळजवळ 1 लाख 90 हजार घरगुती गणेशमूर्ती व 12 हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशमूर्तीची नोंद आहे. यात 99.99 टक्के मूर्ती या पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनवलेल्या असतात. या पीओपी मूर्तींचे समुद्र, खाडी, तलावात विसर्जन केल्याने प्रदूषण होते, अशी ओरड प्रदूषण नियंत्रण मंडळ करते आहे. त्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडू मातीच्या व छोट्या आकाराच्या मूर्ती बनवण्यासाठी केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिका आग्रही आहे. गेल्या वर्षीपासूनच मुंबईत पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी पालिकेने हटवादी भूमिका घेतली होती. मात्र गणेशोत्सव समन्वय समिती, गणेश मंडळे आणि मूर्तिकार यांनी नकारघंटा दर्शवत आक्रमक भूमिका घेतली. तसेच, पीओपी मूर्तीला समाधानकारक, आर्थिक बाबीवर मोठा विपरीत परिणाम करणार नाही, अशी पर्यायी उपाययोजना उपलब्ध करण्याची आक्रमक भूमिका लावून धरली होती.

दरम्यान, राज्य शासनाने त्यातमध्ये नमती भूमिका घेत हस्तक्षेप करून गतवर्षी पीओपी मूर्ती वापरण्यास परवानगी दिली होती. तसेच, पीओपी मूर्तीला पर्याय सुचविण्यासाठी एक तज्ज्ञांची कमिटी गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र या समितीची आजपर्यंत एकही बैठक झाली नसल्याचे मंत्रालय सूत्रांकडून समजते. तसेच, या समितीने अद्यापपर्यंत पर्यावरणाला घातक ठरविण्यात आलेल्या पीओपी मूर्तीला ठोस पर्यायही उपलब्ध केलेला नाही.

- Advertisement -

वास्तविक, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने गतवर्षी गणेश विसर्जन झाल्यावर तातडीने बैठक घेणे आवश्यक होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या बैठकीला मुहूर्त मिळत नव्हता, अशी माहिती मंत्रालय सूत्रांकडून मिळाली आहे. गणेश मूर्तिकार हे गणेश मूर्ती बनविण्यास किमान 9 महिने अगोदरपासूनच सुरुवात करीत असतात. आता गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना म्हणजे 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान होणार असताना व मूर्तिकारांनी बऱ्याचशा गणेशमूर्ती बनविण्यास जोमात सुरुवात केलेली असताना शासनाने वादग्रस्त विषयावर बैठक आयोजित केल्याने ही बैठक वादळी ठरण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, शासनाने आता घाईघाईने पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी न घालता पीओपी मूर्तिला कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध होईपर्यंत तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी सदर बैठकीत केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

राज्य शासन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिकारांनी पीओपी ऐवजी शाडू मातीच्या किमान 2 ते 4 फुटांच्या मूर्ती बनविण्यास आग्रही आहे, तर गणेश मंडळे व मूर्तिकार हे नेहमीप्रमाणे आकर्षक, भव्य दिव्य आणि 20 फूट उंच गणेश मूर्ती बनविण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता आजच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे कोणता सुवर्णमध्य काढणार व शासनाचा पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरा करण्याबाबत समाधानकारक कोणता पर्याय मांडणार व गणेश मंडळे, मूर्तिकार आणि गणेशोत्सव समन्वय समितीची समजूत कशी काय काढणार हे लवकरच समोर येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -