मुंबई : दादरमध्ये असणाऱ्या टोरेस नावाच्या ज्वेलरी कंपनीने लाखो ग्राहकांना हजारो कोटी रुपयांना गंडा घातला आहे. ज्यामुळे सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. पण टोरेसचा हा भांडाफोड नेमका कसा झाला? टोरेसने गुंतवणूकदारांना फसवले आहे, हे नेमके कसे समोर आले, याची माहिती आता समोर आली आहे. ज्या प्रदीपकुमार वैश्य नावाच्या भाजी विक्रेत्याने या टोरेसमध्ये 14 कोटी गुंतवले होते. त्याच्यामुळेच हा इतका मोठा घोटाळा समोर आल्याचे तपासातून उघड झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. 09 जानेवारी) टोरेसच्या दादरमधील दुकानाची झाडाझडती घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. (Torres scam caused by a vegetable seller who invested 14 crores)
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रदीप कुमार वैश्य नावाच्या भाजी विक्रेत्याचे टोरेसच्या गल्लीमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. होलसेल दरात तो भाजी विकतो. या गुंतवणूकीत प्रदीप कुमार वैश्य याने स्वत:चे 4 कोटी तर नातेवाईक मित्र परिवार आणि व्यापारी यांचे मिळून 14 कोटी गुंतवलेले आहेत. ज्यावेळी तो पैशांची गुंतवणूक करण्यास जात असे, त्याचवेळी त्याची ओळख कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबत झाली. तो प्रदीपला प्रत्येक गुंतवणूक आणि त्यावरील ऑफरची माहिती देत असे. पण काही आठवड्यांनंतर हे पैसे येणे बंद झाले. गुंतवणूकदार सुद्धा पैशांच्या चौकशीकरिता दादर कार्यालयात फेऱ्या मारू लागले. पण कंपनीकडून नेहमीच वेगवेगळी कारणे देण्यात येऊ लागली.
हेही वाचा… Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त
टोरेसमध्ये हे सर्व काही घडत असताना भाजी विक्रेता प्रदीप कुमार वैश्य याला संशय आला. यानंतर, प्रदीपच्या संपर्कात असलेला टोरेसाचा कर्मचारी सोमवारी (ता. 06 जानेवारी) पहाटे दादरच्या टोरेस कंपनीच्या मुख्य कार्यालयात होता. त्याचवेळी घाई गडबडीत तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघी सुद्धा पहाटे कार्यालयामध्ये आल्या होत्या. त्या येऊन घाईघाईमध्ये एका कर्मचाऱ्याच्या मदतीने बॅगेमध्ये कार्यालयातील पैसे भरू लागल्या. ज्याची माहिती या कार्यालायतील संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्याने प्रदीप वैश्यला दिली. त्यामुळे प्रदीप सुद्धा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घेऊन टोरेसच्या कार्यालयात पोहोचला. यावेळी टोरेसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघींचा पैसे घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाचा व्हिडिओ बनवला.
भाजी विक्रेता असलेल्या प्रदीप वैश्यने याबाबतची माहिती इतर गुंतवणूकदारांना दिली. ज्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रदीपनेच पोलिसांना सुद्धा याबाबतची माहिती दिली. त्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस सुद्धा दादर कार्यालयात पोहोचले. ज्यानंतर त्यांनी पैसे घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार यांना ताब्यात घेतले. टोरेस कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने प्रदीपला दिलेली माहिती आणि त्याने पोलिसांना दिलेली माहिती यामुळे या महाघोटाळ्याचा भांडाफोड झाला. जर प्रदीपला माहिती देणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती दिली नसती तर तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघीही कार्यालयातील उर्वरित रक्कम घेऊन पसार झाल्या असत्या. पण 14 कोटी गुंतवणाऱ्या प्रदीप कुमार वैश्य याच्यामुळेच या घटनेचा भांडाफोड झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.