मुंबई : दादर स्थित टोरेस या ज्वेलरी ब्रँड असलेल्या कंपनीने लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची घटना सोमवारी (ता. 06 जानेवारी) उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आज गुरुवारी (ता. 09 जानेवारी) आर्थिक गुन्हे शाखेकडून दादरमधील टोरेस कंपनीची झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहे. पण या प्रकरणावरून स्थानिक आमदार महेश सावंत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. माहिम विधानसभेचे ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी या पत्रातून पोलीस आयुक्तांना काही प्रश्न विचारले आहेत. (Torres Scam Mahesh Sawant letter to Police Commissioner)
आमदार महेश सावंत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहित म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील जे. के. सावंत मार्ग, दादर (पश्चिम) येथील वास्तु सेंट्रल बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर आमच्या माहितीप्रमाणे टोरेस ही सोने, चांदी व किमती स्टोनच्या माध्यमातून विक्री आणि गुंतवणूक अशा दोन्ही गोष्टी करणाऱ्या कंपनीबाबत आपणांस काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो. या कंपनीमध्ये अनेक लोकांनी लाखो-करोडे रुपये गुंतवले अशल्चाची माहिती समोर आली आहे. पण आता या कंपनीने फसवणूक केल्याची माहिती समोर आल्यानंतर या दुकानासमोर हजारो लोकांची गर्दी आणि उद्रेक पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिक त्यांच्या गुंतवलेल्या पैशाच्या विवंचनेत आणि संतापलेल्या परिस्थितीत दुकानासमोर गर्दी करून उभे असल्याचे आमदार महेश सावंत यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
हेही वाचा… Torres Scam : आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर; टोरेस घोटाळ्यातील फरार तौसिफ रियाजची माहिती
तसेच, आमदार महेश सांवत यांनी आयुक्तांना लिहिलेल्या या पत्राच्या माध्यमातून प्रश्न विचारत म्हटले आहे की, या इमारतीचा गाळा भाड्याने देताना मालक व भाडोत्री यांच्यामध्ये करारनामा झाला होता का? जर करारनामा झाला होता, तर पोलीस प्रशासनाकडून कोणती परवानगी घेतली होती का? पोलिसांना भाडेकरूची संपूर्ण माहिती देण्यात आली होती का? असे प्रश्न आमदार सांवत यांच्याकडून विचारण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रश्नांबाबत पोलीस आयुक्तांकडून नेमके काय उत्तर देण्यात येते? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये सर्वेश सुर्वेसह तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमारी यांचा समावेश आहे. तर, तौसिफ रियाज आणि अभिषेक गुप्ता फरार आहेत.
टोरेस कंपनीने मुंबई, नवी मुंबई, कल्याण परिसरात सहा कार्यालये सुरू केली होती. या कार्यालयाच्या माध्यमातूनच त्यांनी लाखो मुंबईकरांची फसवणूक केली आहे. दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा सुरू केल्या होत्या. पण अचानक सोमवारी (ता. 06 जानेवारी) या सहाही ठिकाणची कार्यालये बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या कंपनीत गुंतवलेल्या रकमेतून 10 टक्के परतावा मिळण्याच्या लालसेने काही लोकांनी तर आपल्या आयुष्याची जमापुंजी या कंपनीला दिली. तर अनेकांनी आपले घर, सोन किंवा कर्ज घेऊन या कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.