सीबीडीत 80 गुंतवणूकदारांची फसवणूक

पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवले

नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करून वीस महिन्यांमध्ये दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या कंपन्यांवर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कंपन्यांकडून तब्बल ८० गुंतवणुकदारांकडून २ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आर्थिक फसवणूक करणार्‍या चौकडीपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून एका महिला संचालकाचा शोध घेतला जात आहे.
कंपनीचे मालक अभिजीत मधुकर पाटील, संचालक मुकुंद अशोक पुराणिक (रा. कामोठे) आणि वनिता एन्टरप्रायजेसचे मॅनेजर योगेश राजाराम बिलये (रा. कलंबोली) यांना पोलिसांनी अटक केली. तर संचालक वनिता पाटील ही मात्र फरार आहे.

सी.बी.डी.पोलीस ठाणे, सेक्टर १५, ब्रह्मा शॉपिग सेंटर, डी-मार्ट समोर, ५ वा मजला येथील वनिता एंटरप्रायजेस या ऑफीसमध्ये गुंतवणुकदारांना २० महिन्यांमध्ये दुप्पट परतावा मिळवून देतो, तसेच कंपनीकरता गुंतवणूकदार मिळवून दिल्यास प्रत्येक गुंतवणुकीच्या मोबदल्यात २ टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. वनिता एंटरप्रायजेस, त्रिशुल गोल्ड प्रा.लि. आणि त्रिशुलिन ट्रेडींग प्रा.लि. या कंपनीच्या नावे ठेवी स्वीकारून गुंतवणूकदारांचा परतावा रक्कम दिली नाही. तसेच गुंतवणूक केलेली रक्कमही दिली नाही.

याबाबत एका तक्रारदाराने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शाखेचे बी.जी.शेखर-पाटील, पोलीस उप आयुक्त प्रविणकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी एस.चांदेकर आणि मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शााखेचे प्रभारी एन.कोल्हटकर यांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करुन या फसवणूक करणार्‍या कंपनीला धडा शिकवला आहे. या बोगस कंपनीने ८० गुंतवणूकदारांची २ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती आहे. आणखी किती जणांना या कंपन्यांनी फसविले आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांचे आवाहन
वनिता एंटरप्रायजेस, त्रिशूल गोल्ड प्रा.लि. आणि त्रिशुलीन ट्रेडिंग प्रा.लि.या कंपनीच्या फसवणुकीच्या योजनांमध्ये नागरिकांनी गुंतवणूक करू नये. या कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा, कक्ष १, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.