राणी बाग सुट्ट्यांमुळे बुधवारीसुध्दा सुरु ठेवा, साप्ताहिक सुट्टीमुळे पर्यटकांचा हिरमोड

tourist demand Rani Bagh open continue on Wednesdays also during holidays
राणी बाग सुट्ट्यांमुळे बुधवारीसुध्दा सुरु ठेवा, साप्ताहिक सुट्टीमुळे पर्यटकांचा हिरमोड

संपूर्ण मुंबईतील पर्यटन स्थळे पहिली आणि फक्त राणी बाग बघायचे राहिले तर खऱ्या अर्थाने मुंबईतील पर्यटन पूर्ण होत नाही. मात्र बुधवारी साप्ताहिक सुट्टीमुळे राणीची बाग बंद असल्याचे माहिती नसलेल्या अनेक पर्यटकांचा विशेषतः बच्चे कंपनी, महिला वर्ग यांचा चांगलाच हिरमोड झाला. तर बच्चे कंपनी तर घरच्यांवर चांगलीच रुसून बसल्याचे बुधवारी राणी बागेच्या प्रवेशद्वारावर बघायला व अनुभवायला मिळाले. या पर्यटकांमध्ये कोणी मुंबई बाहेरून म्हणजे विरार, वाशी, टिटवाळा तर कोणी राज्या बाहेरून म्हणजे बेंगळुरू येथून आले होते. कोणी अगदी तान्हुल्याला, लहान मुलांना घेऊन आले होते तर कोणी नवीन जोडपे होते. तर कोणी प्रियकर – प्रेयसी होते. या सर्वांनी राणी बागेच्या दरवाजावर आल्यानंतर बोटे मोडीत घरी परतणे पसंत केले. तर काही लोकांनी गेटवे ऑफ इंडिया, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी येथे तर काहींनी घरी परतणे पसंत केले.

राणीची बाग साप्ताहिक सुट्टीमुळे बंद ठेवल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता मुलांच्या शाळा बंद आहेत. उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे. त्यामुळे आम्ही मुलांना, कुटुंबीयांना सोबत घेऊन राणीची बाग, त्यातील प्राणी, पक्षी, पेंग्विन बघायला लांबचा प्रवास करून अगदी उन्हात इथे राणीच्या बागेत आलो. मात्र राणीची बाग बंद असल्याचे इथे आल्यावर समजले आणि मोठा धक्काच बसला. आता मुलांना राणीची बाग कशी काय दाखवणार ? आता रविवारशिवाय राणी बागेत यायला मिळणार नाही. राणी बाग प्रशासनाने किमान थोडा वेळ तरी आमच्या मुलांना आतमध्ये सोडून प्राणी बघायला द्यायला पाहिजे, असे राणी बागेच्या प्रवेशद्वारात ताटकळत बसलेल्या पालकांचे, महिलांचे म्हणणे होते. मात्र तेथे त्यांचे म्हणणे, त्यांच्या वेदना ऐकायला कोणीही नव्हते.

राणी बाग सुरूच ठेवावी. सुट्टी असेल तर पर्यटकांना माहिती द्या -: पर्यटकांची मागणी

सय्यद अमीर (७०), बेंगळुरू, कर्नाटक -:

मी, माझी तीन मुले, सुना, नातवंडे असे सर्वजण बेंगळुरू येथून आलो असून मुंबई फिरलो. मात्र आज ३ टॅक्सी करून डोंगरी येथून नातेवाईकांच्या घरून राणी बाग बघायला आलो. पण आज सुट्टी असल्याने राणी बाग बंद आहे. आता नाईलाजाने दादर चौपाटी बघायला जातो.मात्र राणी बाग प्रशासनाने साप्ताहिक सुट्टीबाबत अधिक जनजागृती करून लोकांना माहिती दिल्यास त्यांना धक्का खावा लागणार नाही.

संजय पवार, विरार -:

४ मुली, एक महिला व मी असे आम्ही ६ जण राणीची बाग बघायला विरार येथून आलो होतो. मात्र आज बुधवारी राणीची बाग बंद असते हे माहिती नव्हते. पालिकेने नागरिकांना याबाबत पूर्वसूचना , माहिती द्यायला हवी. जनजागृती करायला पाहिजे.

लता गायकवाड , वाशी

आम्ही दोन लहान मुलांना घेऊन धावपळ करीत राणीची बाग,प्राणी दाखवायला येथे आलो. मात्र राणी बाग आज बंद असल्याचे पाहून आता घरी परतावे लागणार आहे. वास्तविक, मुलांना सुट्टी पडली असल्याने राणी बाग बुधवारी बंद न ठेवता सुरूच ठेवायला पाहिजे. शाळा सुरू झाल्यावर त्यांना यायला मिळणार नाही.

नियमाने राणी बाग एक दिवस बंद ठेवणे बंधनकारक 

आंतरराष्ट्रीय झू पार्क नियमांनुसार प्राणी संग्रहालय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे बंधनकारक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राणीची बाग दर बुधवारी बंद असते. सुट्टीच्या दिवशी प्राण्यांना थोडी मोकळीक मिळते. देखभाल, दुरुस्ती कामे, स्वच्छता वगैरे करण्यात येतात. सतत नागरिकांच्या सान्निध्यात असल्याने त्यांना थोडा तणावमुक्त जीवन जगता येते. पालिकेने वेबसाईटवर बुधवारी राणी बाग बंद असते, याची माहिती दिली आहे. यापुढे नागरिकांना राणी बाग बुधवारी बंद असते, याबाबतची माहिती अधिक चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.


हेही वाचा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, १० जूनला होणार मतदान