तब्बल २००० टन विषारी रसायन ड्रममध्ये भरून जमिनीत पुरले

Toxic chemicals

अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात जमिनीत पुरलेले शेकडो ड्रम आणि पावडर आढळले असून त्यात २००० टन विषारी रसायन असल्याचे आढळून आले आहे. या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळताच या रसायनावर प्रक्रिया करून त्यातील घातक द्रव्ये नष्ट करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाला करवले गावात विषारी रसायने आणि पावडर ड्रम आणि पिशव्यांमध्ये भरले असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे या विभागाचे अधिकारी प्रमोद लोणे आणि त्यांच्या पथकाने अंबरनाथ (पूर्व) येथील आनंदनगर एमआयडीसीजवळ असलेल्या करवले गावात गेल्या आठवड्यापासून कारवाई सुरू केली आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने जमिनीत पुरलेले ड्रम आणि पिशव्या काढण्यात येत असून आतापर्यंत ४२५ ड्रम आणि असंख्य पिशव्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. यात २००० टन घातक रसायने आणि पावडर आढळून आली आहेत. यापूर्वी हाजी मलंग गडाच्या पायथ्याला असलेल्या गावाजवळ ३०० रासायनिक द्रव्य असलेले ड्रम आढळले होते. तर काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या अ‍ॅरीमॅटिक कंपनीने वालधुनी नदीत विषारी रसायने सोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

ज्याठिकाणी ही घातक रसायने आढळली ती जमीन करवले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. याबाबत करवले गावाचे सरपंच बाळू वाघे यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्या जमिनीत रसायने पुरलेली आहेत. ती जमीन गावापासून दीड किलोमीटर लांब आहे. ही जमीन गुरचरण असून उसाटने गावाच्या हद्दीत येते. तसेच या कारवाईबाबत मला काहीच माहीत नाही.

अंबरनाथ शहरात आनंदनगर एमआयडीसी, मोरीवली एमआयडीसी, अंबरनाथ (प.) एमआयडीसी अशा तीन विविध ठिकाणच्या एमआयडीसी आहेत. काही अंतरावर बदलापूर, तळोजा एमआयडीसी आहेत. याठिकाणी हजारो कारखाने असून नेमक्या कोणत्या कारखान्यांनी ही रसायने पुरली आहेत, हा संशोधनाचा विषय बनला आहे. काही स्थानिक कारखान्यातून आणि गुजरात, आंध्र प्रदेश आणि शेजारील राज्यातील ट्रक आणि रासायनिक टँकर रात्रीच्या सुमारास येतात. असामाजिक तत्त्वांच्या मदतीने ही रसायने जमिनीत पुरतात अथवा वालधुनी नदीत सोडतात. वाहतूक पोलीस, शिवाजीनगर पोलीस, हिल लाईन पोलीस दिवसरात्र पोलीस बंदोबस्तात असतात. मात्र, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात, अशी माहिती काहींनी नाव न देता दिली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे यांना विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वीही अशाप्रकारे जमिनीत ड्रम पुरण्याचे प्रकार करवले आणि आसपासच्या गावात आढळून आले आहेत. आम्ही या रसायनांची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व ड्रम आणि पिशव्या तळोजा प्रक्रिया केंद्रात स्थलांतरीत केल्या आहेत. ही कारवाई अतिशय काळजीपूर्वक करावी लागते आणि यासाठी करोडो रुपयांचा खर्च झाला आहे. या कारवाईसाठी आम्हाला आणखी निधीची आवश्यकता आहे. या प्रकारामुळे मानवी जीवाला धोका निर्माण झाला असून संबंधित लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पत्र आम्ही २७ डिसेंबर रोजी हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांना दिले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र मला प्राप्त झाले आहे. जी कारवाई नमूद केली आहे, ती कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा १९८६ च्या अंतर्गत केली जाऊ शकते. जी घातक रसायने प्राप्त झाली आहेत, त्यांचे नमुने तपासणीसाठी आम्ही प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यासंदर्भात आमची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा सुरू आहे.
– घनश्याम पलंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिल लाईन पोलीस स्टेशन