घरमुंबईमनसेच्या पुढाकारामुळे शिळफाटावरील वाहतूक कोंडीचा विळखा सुटणार!

मनसेच्या पुढाकारामुळे शिळफाटावरील वाहतूक कोंडीचा विळखा सुटणार!

Subscribe

मनसे आमदारासह वाहतूक पोलीस, एमएमआरडीए एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला.

गेल्या काही वर्षांपासून कल्याण-शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, पनवेल, नवीमुंबई, मुंब्रा आणि ठाण्यातील प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पुढाकाराने वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रत्यक्ष जाऊन वाहतूक कोंडीची पाहणी केली. यावेळी कल्याण-शिळफाटा परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून महिन्याभरात सोडवण्यात येईल, असे ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

आमदार पाटील यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांसमवेत केला पाहणी दौरा 

कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि दिवा परिसरातील प्रवाशांना सकाळच्या वेळेस मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलच्या दिशेने जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहन चालकांना तब्बल अर्धा ते एक तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूलाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे दिला आहे. तर रस्त्याच्या कडेला झालेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे टीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कल्याणफाटा ते महापेकडे जाणाऱ्या पर्यायी (टेकडीवरील रस्ता) रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शनिवार ते मंगळवार या दिवसात खड्डे बुजवून रस्ता खड्डे मुक्त करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी येत्या शनिवार पासून मंगळवार पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपयोजना काय आहेत?

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपयोजना केल्या जाणार आहेत असे ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. लाँग टर्ममध्ये उड्डाणपूल बनवणे, अंडरपास तयार करणे आणि रस्ते मोठे करणे या उपाययोजना केल्या जातील. एमएमआरडीएमार्फत हे काम करण्यात येईल. तर शॉर्ट टर्ममध्ये जंक्शन मोठे करणे, काही ठिकाणी बॅरीगेट उभारणे, लेफ्ट फ्री करणे, काही ठिकाणी डिव्हायडर बंद करणे तसेच रस्त्याच्या मधोमध असलेले पोल हटविणे ही काम केली जातील. त्यामुळे महिन्याभरात वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होईल असे पोलीस उपायुक्त काळे यांनी सांगितले.

यावेळी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाने, मोहन पाटील, एमएमआरडीएचे इंजिनिअर प्रशांत चाचरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते, ठाणे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम अभियंता रामदास शिंदे, केडीएमसी मनसे गटनेते मंदार हळबे, मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, राहुल कामत, कल्याण ग्रामीण विधानसभा मनोज घरत, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हात्रे, बाबुराव मुंढे, शाखा अध्यक्ष शरद पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई मधील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल यासाठी हा एकत्रित पाहणी दौरा केला. याचे परिणाम लवकरच जनतेला दिसतील आणि सर्वांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. – आमदार प्रमोद(राजू) पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा


हेही वाचा – येऊरमध्ये आता खेळांवर बंदी; वनविभागाची टर्फ क्लबला नोटीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -