घरताज्या घडामोडीत्या महिलेने वर्दीवर हात टाकला; मात्र वर्दितल्या महिलेने ट्राफिक हवालदाराचा सत्कार केला

त्या महिलेने वर्दीवर हात टाकला; मात्र वर्दितल्या महिलेने ट्राफिक हवालदाराचा सत्कार केला

Subscribe

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काळबादेवी परिसरात कर्तव्य बजावत असताना एका ट्राफिक हवालदाराला एका महिलेकडून अपमानास्पद वागणूक मिळाली होती. भररस्त्यात खोटा आरोप लावून या महिलेने संबंधित पोलिसाला भररस्त्यात मारहाण केली होती. मात्र ट्राफिक पोलिसाने आपला संयम ढळू न देता त्या प्रसंगाला तोंड दिले. मारहाण करणारी आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक झाली आहेच. त्याशिवाय संयम बाळगणाऱ्या या ट्राफिक पोलीस हवालदाराचा त्याच रस्त्यावर सहाय्यक आयुक्तांच्याहस्ते सत्कार करण्यात आला आहे. पोलीस दलातील वरिष्ठांनी याप्रकारे सत्कार केल्यामुळे पोलीस दलाचे मनोधैर्य निश्चितच वाढले आहे.

काळाबादेवी येथील रस्त्यावर ट्राफिक हवालदार एकनाथ पार्टे हे कर्तव्य बजावत होते. दि. २५ ऑक्टोबर रोजी एक महिला आणि तिचा सहकारी दुचाकीवरुन विनाहेल्मेट प्रवास करत असल्यामुळे पार्टे यांनी दुचाकी थांबवून जाब विचारला. तसेच दंडात्मक कारवाई करत असताना आरोपी महिला सादविका तिवारी आणि मोहसिन खान यांनी पार्टे यांच्यासोबत बाचाबाची करण्यास सुरुवात केली. तसेत आरोपी महिलेने पार्टे यांच्या वर्दीची कॉलर पकडून त्यांना जबर मारहाण आणि शिवीगाळ केली. यावेळी महिलेचा साथीदार हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता. घटनेची माहिती मिळताच महिला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेला ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पोलिसांच्या वर्दीवर हात टाकल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला होता. मात्र तरिही पार्टे यांनी आपला तोल न ढळू देता संयम राखला. त्यामुळेच कुलाबा विभाग सहायक पोलीस आयुक्त लता धोंडे यांनी ट्राफिक हवालदार एकनाथ पार्टे यांना भररस्त्यात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच दोन्ही आरोपींची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही आयुक्त धोंडे यांनी दिले.

- Advertisement -

एकनाथ पार्टे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विट करत या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. “या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय. Take Action,” असं ट्विट त्यांनी केले होते.

मारहाणीचा व्हिडिओ पाहा – 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -