Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई नागपूर आयटीआयमध्ये फ्रेंच शिक्षकांकडून प्रशिक्षण; एरोनॉटिकल स्ट्रक्चरचे तीन वर्षे देणार धडे

नागपूर आयटीआयमध्ये फ्रेंच शिक्षकांकडून प्रशिक्षण; एरोनॉटिकल स्ट्रक्चरचे तीन वर्षे देणार धडे

नागपूर आयटीआयमध्ये गतवर्षांपासून तीन फ्रेंच प्रशिक्षक या अभ्यासक्रमाचे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. आयटीआयमध्ये पहिल्यांदाच फ्रेंच प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

विमानाच्या साहित्याचे डिझाइन करण्यापासून उत्पादनांपर्यंत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी देशात प्रथमच नागपूर आयटीआयमध्ये सुरू केलेल्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्विपमेंट फिटर अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विद्यार्थ्यांना अधिक सखोल प्रशिक्षण मिळावे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने फ्रान्सच्या डॅसल्ट कंपनीसोबत करार केला होता. त्यानुसार नागपूर आयटीआयमध्ये गतवर्षांपासून तीन फ्रेंच प्रशिक्षक या अभ्यासक्रमाचे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. आयटीआयमध्ये पहिल्यांदाच फ्रेंच प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

हवाई उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन कंपनीसोबत केंद्र सरकारने एरोनॉटिकल स्ट्रक्चर ऍण्ड इक्वीपमेंट फीटर या अभ्यासक्रमासाठी तीन वर्षांचा करार केला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने तातडीने अंमलबजावणी करत नागपूर आयटीआयमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमासाठी डॅसल्ट कंपनीकडून यंत्रसामुग्री, साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार २०१९ मध्ये नागपूर आयटीआय तुकडी सुरू केली असून, त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी व शिक्षकांना अधिक उत्तम शिक्षण मिळावे यासाठी करारानुसार नागपूर आयटीआयमध्ये फ्रान्समधून तीन प्रशिक्षक तीन वर्षांसाठी नागपूरमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत. फ्रान्समधील अलेड डोरियथ, रिचर्ड प्रायमॉल्ट व क्रीष्टीलिनी कॅरी हे शिक्षक सध्या नागपूर आयटीआयमधील विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. हा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थ्यांना संपूर्ण भारतभरातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून एव्हिएशन सेक्टरमध्ये तसेच हाय अ‍ॅण्ड ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमधूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. हे प्रशिक्षणार्थी भविष्यात एव्हिएशन सेक्टरमध्ये उच्च शिक्षणही घेऊ शकतात, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचाकल दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिली.

राज्यपालांकडून अभ्यासक्रमाची दखल

- Advertisement -

भारतामध्ये डसॉल्ट एव्हिएशनच्या सहकार्याने पहिल्यांदाच सुरू केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भेट देण्याची यावर्षी ही पहिलीच वेळ आहे. त्याचप्रमाणे फ्रान्सचे भारतातील राजदूत एच.ई. इम्मॅन्युअल लेनिन यांनीही या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आहे.

- Advertisement -