घरमुंबईनवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आयुक्तांच्या बदल्या एकनाथ शिंदेंनी बसवले अजितदादांनी हटवले

नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आयुक्तांच्या बदल्या एकनाथ शिंदेंनी बसवले अजितदादांनी हटवले

Subscribe

आयुक्त समीर उन्हाळेंची १५ दिवसात तर चंद्रकांत डांगेंची २ महिन्यातच उचलबांगडी

राज्यातील नगरविकास खात्यात बदल्यांचा सावळागोंधळ सुरू असून १५ दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर आयुक्तपदी नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांची मंगळवारी अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनाही तडकाफडकी बदलत त्यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकारी ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये आयुक्तपदी नेमले आहेत. विशेष म्हणजे मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या दोन महापालिका आयुक्तांची नियुक्ती काही दिवसांपूर्वीच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र या आयुक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पदावरून हटवल्याचे खात्रीलायकरित्या समजते. अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी मंगळवारी ठाण्यात एकच चर्चा सुरू होती.

मंगळवारी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या चार महापालिका आयुक्तांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईच्या आयुक्तपदी डॉ. अभिजित बांगर यांना नेमण्यात आले. नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत नवी मुंबईकरांमध्ये करोनाच्या काळात नाराजी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या हट्टामुळे त्यावेळी मिसाळ यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. ठाण्याचे आयुक्त विजय सिंघल यांना हटवून विदेशी प्रशिक्षणावरून राज्यात परत आलेले डॉ. विपीन शर्मा यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मिसाळ यांचे मुंडे परिवाराशी असलेले निकटचे संबंध सर्वश्रुत आहेत. सत्तांतर झाल्यानंतर मिसाळ यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जुळवून घेतले . नवे आयुक्त बांगर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याचे समजते. उल्हासनगरात समीर उन्हाळेंना १५ दिवसात धक्का दिला. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त उन्हाळे यांची १५ दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली होती. उन्हाळे यांच्या जागी राजा दयानिधी आयुक्त असतील. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अधिकार्‍यांवर पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा वचक राहिलेला नाही.

- Advertisement -

त्यामुळे पुन्हा त्यांना उल्हासनगरात आणण्यात आल्याने सनदी अधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली सलगी उन्हाळेंच्या पथ्यावर पडली होती. उल्हासनगर पालिका आयुक्तांच्या बाबतीतही अजित दादांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच दिलेले शिंदेंच्या मर्जीतील पालिका आयुक्त राज्य सरकारने पुन्हा बदलले आहेत. राज्य सरकारच्या या बदल्या नाट्यात शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आता नव्याने आलेले, नव्या दम्याचे पालिका आयुक्त रोखणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

मीरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांचा विरोध डांगेंना भोवला?
मीरा-भाईंदर पालिका आयुक्तपदी चंद्रकांत डांगे यांची २ महिन्यांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोध चंद्रकांत डांगेंना भोवला असल्याची चर्चा मीरा-भाईंदरमध्ये सुरू आहे. त्यामुळे नगरविकास खाते जरी ठाण्याच्याच एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाहीला हलकासा धक्का दिल्याचे बोलले जाते. मातोश्रीने लक्ष घातल्यामुळेच दोन महिन्यात चंद्रकांत डांगेंची पालिका आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. डॉ. विजय राठोड यांची मीरा-भाईंदर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -