मिरा-भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

MIRA BHAYENDAR MAHAPALIKA

भाईंदर – मिरा-भाईंदर महापालिकेतील उपायुक्त अजित मुठे यांची  बदली करण्यात आली असून आयुक्त दिलीप ढोले यांनी बुधवारी पालिकेतील सहाय्यक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त म्हसाळ यांची बदली झाल्यापासून हे पद गेल्या काही दिवसांपासून खाली होते. त्यांच्या जागी अनिकेत मानोरकर यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. तर महापालिकेतील उपायुक्त अजित मुठे यांची वसई विरार महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

तसेच आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रभाग समिती कार्यालय क्र. ६ चे सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन यांची बदली प्रभाग समिती कार्यालय क्र. ४ मध्ये करण्यात आली आहे. प्रभाग समिती कार्यालय क्रमांक १ चे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बच्छाव यांची प्रभाग समिती कार्यालय क्र. ६ मध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य विभागाचा अतिरीक्त पदभार कायम ठेवण्यात आला आहे. पे अँड पार्क विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले यांची प्रभाग समिती कार्यालय क्रमांक १ मध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर व ग्रंथालय विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. पर्यावरण, वाहन व वृक्षप्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कविता बोरकर यांच्याकडे वैद्यकीय, उद्यान व पे अँड पार्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. तसेच सहाय्यक जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कांबळे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त पदी बढती देत आयुक्तांनी त्यांची बदली प्रभाग समिती कार्यालय क्रमांक २ मध्ये केली आहे. उद्यान विभागाचे उपमुख्य अधिक्षक हंसराज मेश्राम यांच्याकडील प्रभाग समिती कार्यालय क्रमांक २ चा पदभार काढून घेत त्यांच्याकडे उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाचा पूर्णवेळ पदभार सोपविण्यात आला आहे.