घरमुंबई...म्हणून उल्हासनगर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची बदली

…म्हणून उल्हासनगर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची बदली

Subscribe

गॅस चोरी प्रकरणातील आरोपीवर कारवाई करताना तडजोड करण्यात आल्याचा ठपका उल्हासनगर गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. विभागीय चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. 

घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या लक्ष्मण जाधव याच्यावर कारवाई न करता दोन पोलिसांनी तडजोड केली. ही तडजोड करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाच्या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. अखेर त्या तीन पोलिसांची उल्हासनगर गुन्हे शाखेतून तडकाफडकी बदली करून विभागीय चौकशी लागली आहे.

उल्हासनगरच्या एच. पी. गॅस एजन्सीमध्ये काही वर्षांपूर्वी काम करत असलेला लक्ष्मण जाधव हा गॅस सिलेंडर मधून गॅस चोरत असताना त्याला गुन्हे अन्वेषण विभागाचे जावेद मुलानी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले यांनी पकडले. यावेळी लक्ष्मण याने स्वतःला वाचवण्यासाठी उल्हासनगर गुन्हे अन्वेषणमध्ये कार्यरत असलेल्या भरत नवले यांना दूरध्वनी केला आणि मोबाईल जावेद मुलानी यांच्याकडे दिला. त्यांच्यात झालेल्या संभाषणात लक्ष्मण हा हफ्ता पोहचवत असल्याचे मुलानीला सूचित करत, तेथून निघा काय ते नंतर बघू असे सांगत असल्याची ही ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली. त्यावेळी भरत नवले हा गुन्हे शाखेचा वसुली म्हणजेच कलेक्टर असल्याचे समोर आले.

- Advertisement -

ही क्लिप लक्ष्मण बरोबर काम करणारा त्याचा मित्र विलास शेळके याने व्हायरल केली आहे. ह्या घृणास्पद प्रकारानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे होते. पण त्यांना अभय देण्यात आले. हा सगळा प्रकार तेथील पत्रकाराला कळताच त्यांनी रितसर वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. पण काहीच घडले नाही. घडल्या प्रकाराबद्दल उल्हासनगर गुन्हा अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना एका स्थानिक पत्रकाराने विचारले असता त्यांनी हे कॉल रेकॉर्डिंग खोटे असल्याचा दावा केला आहे. तर एकीकडे हेच रेकॉर्डिंग २ वर्ष जुने असल्याचेही म्हटले आहे. तर दुसरीकडे स्वतः लक्ष्मण यानेच हे कॉल रेकॉर्डिंग खर असून, ते त्याचा मित्र विलास शेळके याने पसरवल्याचे मान्य केले.

हेही वाचा – जन आशीर्वाद यात्रेतून युवा सेना मतदारांना साद घालणार!

लक्ष्मणचे परिचित आणि उल्हासनगर कोर्टात काम करणारे धर्मराज सांगळे यांच्याशी बोलतांना लक्ष्मण याने ही गोष्ट मान्यही केली. पण सोबतच आपण पोलिसांच्याच बाजूने उभे राहणार असल्याचे विधानही त्याने केले आहे. अखेर ठाणे पोलिसांनी आपली स्वच्छ प्रतिमा कायम ठेवण्यासाठी वादात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले, हवलदार भरत नवले आणि जावेद मुलानी यांची तडकाफडकी ठाणे कंट्रोल येथे बदली करण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशीसुद्धा लावलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -