घरलोकसभा २०१९जरा हटकेलोकसभेसाठी मुंबईतून दोन तृतीयपंथी, एक अंध उमेदवार

लोकसभेसाठी मुंबईतून दोन तृतीयपंथी, एक अंध उमेदवार

Subscribe

दुर्बल घटक आघाडीकडून भरले अर्ज

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. उमेदवारांच्या अर्ज भरण्याकडे सार्‍यांचे लक्ष लागले असतानाच मुंबईतून ईशान्य मुंबईतून व उत्तर मध्य मुंबईतून तृतीयपंथीयाने तर दक्षिण मुंबईतून अंध उमेदवाराने दुर्बल घटक आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

तृतीयपंथीय, जोगती, देवदासी, अंध, विधवा यांसह समाजातील अन्य दुर्बल घटकांच्या समस्यांकडे नेहमीच राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक वर्षांपासून समाजातील हा घटक कायम मागास राहिला आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांनाही समाजात मान मिळावा यासाठी दुर्बल घटक आघाडीच्या माध्यमातून तृतीयपंथी जतीन महाराज यांनी ईशान्य मुंबईतून तर सागर उर्फ स्नेहा काळे यांनी उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी अर्ज भरला. तसेच दक्षिण मुंबईतून राजेश दयाळ या अंध उमेदवाराने अर्ज भरला आहे. दुर्बल घटक आघाडीने राज्यात 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत.

- Advertisement -

तृतीयपंथी, जोगती, विधवा, नाका कामगार, रिक्षाचालक, घरकाम करणार्‍या महिला या तळागाळातील समाजाला न्याय मिळावा यासाठी मी निवडणुकीला उभा राहिलो आहे. तृतीयपंथीय, जोगती यांना समाजामध्ये कधीच समाविष्ट करून घेतले जात नाही. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, पण त्याअनुषंगानेे ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित होते तसे झाले नाही. त्यामुळे आमच्या समाजाच्या उत्कर्षासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कारण न्यायालयाने त्यांचे काम केले आहे. आता पुढील लढा आम्हालाच द्यायचा आहे, असेही जतीन महाराज यांनी सांगितले.

हातावर पोट असणार्‍यांना महागाईचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. आमच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे. त्यामुळे तरुणांसह तृतीयपंथीय, जोगती यांच्या रोजगारांच्या प्रश्नावर आम्ही प्रचारात भर देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. प्रत्येकजण आरक्षण मागत आहेत. मग तृतीयपंथीय व जोगती समाजातील सुशिक्षितांना सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण का नको, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार राज्यसभेवर क्रीडा, कलाक्षेत्रातील व्यक्तींची निवड करते. मग आमच्या समाजातील व्यक्तींना का प्रतिनिधित्व देत नाही. आमच्या समाजातील सुशिक्षितांना विधानसभेवर घेतल्यास आमच्या समस्या आम्हाला तेथे मांडता येतील, असेही जतीन महाराज म्हणाले.

- Advertisement -

उत्तर मध्य मुंबईतून सागर उर्फ स्नेहा काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. समाजातील गरीब, वंचित, विधवा, देवदासी, तृतीयपंथीय, जोगती यांच्याबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. भारतीय संविधानाने आम्हाला हक्क दिले असले तरी अनेक वर्षांपासून आम्हाला मिळत असलेल्या वागणुकीमुळे आम्ही पारतंत्र्यात आहोत. आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत. आमच्या समस्यांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक र्दुबल, वंचित घटकाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे स्नेहा काळे यांनी सांगितले. आम्ही मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाशी संवाद साधून प्रचार करणार आहोत. गाणी व परंपरागत वाद्यांचा वापर आम्ही करणार असल्याचेही स्नेहा काळे यांनी सांगितले.

विचारधारेविरोधात आमचा लढा
आमचा लढा हा राजकीय पक्षांविरोधात नसून विचारधारेविरोधात आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवार नागरिकांकडे हात जोडून येतात, पण जिंकल्यानंतर नागरिकांच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. महाराष्ट्राचा कारभार हा दक्षिण मुंबईतून चालतो. त्यामुळे मी दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे अंध असलेले राजेश दयाळ यांनी सांगितले. मी ही निवडणूक सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढवत आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -