घरमुंबईधोकादायक झाडांमुळे मुंबईकरांचा जीव टांगणीला!

धोकादायक झाडांमुळे मुंबईकरांचा जीव टांगणीला!

Subscribe

पावसाळ्यात मुंबईतील धोकादायक इमारती कोसळणे, डोंगरालगतच्या वस्त्यांवर दरडी कोसळणे अशा घटनांमध्ये रहिवाशांना आपला जीव गमवावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात धोकादायक झाडांची समस्या भेडसावू लागली असून, त्यात मुंंबईकर बळी पडण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. नुकताच झाडाची फांदी डोक्यावर पडून एका ९१ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. ही घटना वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव परिसरात सोमवारी घडली. सुखी लीलाजी असे मृत महिलेचे नाव आहे.

चार मुंबईकरांचे बळी

पावसाळा जवळ येत असताना अपुरी नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे अशा समस्या मुंबईकरांपुढे ‘आ’ वासून उभ्या राहिल्या. त्यातच आता मुंबईतील धोकादायक झाडे मुंबईकरांच्या जीवावर उठली आहेत. गेल्या वर्षभरात कोसळलेल्या झाडांनी मुंबईत चारजणांचे बळी घेतले आहेत.

- Advertisement -

बाणगंगा परिसरात राहणारी सुखी लीलाजी या ९१ वर्षीय महिला आपल्या नातेवाइकांसोबत फेरफटका मारण्यासाठी बाणगंगा तलावाजवळ आल्या होत्या. त्यावेळी एका झाडाची फांदी त्यांच्या अंगावर पडली. फांदी अंगावर पडल्याने सुखींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तातडीने गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
सुखी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत तसेच त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चरही झाले होते. त्यातच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्रावामुळे सुखी यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
झाडे पडून नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये मुंबईत वाढ होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी आहे, असा दावा मुंबई महानगरपालिका करत असली तरी अपघातांची संख्या कमी नाही. यंदा पाऊस काळ सुरु होण्याआधीच अशी घटना घडल्यामुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनाक्रम

  • २६ ऑगस्ट २०१६ वर्सोवा गार्डनमध्ये नारळ डोक्यावर पडून वेदप्रकाश आर्या ४२ वर्षीय इसमाचा मृत्यू.
  • ७ जून २०१७ कुलाबा, नेव्ही नगर येथे अंगावर झाड पडून राहुल नावाच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू.
  • २२ जुलै २०१७ चेंबूर येथे नारळाचे झाड अंगावर कोसळून कांचन रघुनाथ या ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू.
  • ७ डिसेंबर २०१७ चेंबूर येथे झाड अंगावर कोसळून श्रद्धा घोडेवार या महिलेचा जागीच मृत्यू.
  • २० एप्रिल २०१८ दादर येथे अंगावर झाड कोसळून दीपक सांगळे या ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

वृक्षतज्ज्ञच नाहीत

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची वृक्षप्राधिकरण नावाची एक समिती आहे. पण त्यात फक्त राजकारण्यांचा भरणा असून एकही वृक्षतज्ज्ञ नाही. या समितीत १५ सदस्य आहेत. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासहित शिवसेनेचे सहा, भाजपचे पाच, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा त्यात समावेश आहे. मात्र समितीतील वृक्ष तज्ज्ञांसाठी असलेल्या १० जागा अद्यापही रिकाम्या आहेत.

झाडे का पडतात?

  • झाडाच्या बुंध्याजवळ काँक्रिटीकरण
  • बेकायदा खोदकाम
  • वीज केबल, पाईप लाईन टाकताना मुळांना होणारी इजा
  • झाडांच्या फांद्यांची अयोग्य पद्धतीने छाटणी
  • झाडांचे आयुष्य शोधण्यासाठी आधुनिक साधनांचा अभाव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -