‘म्हणून मी आंदोलनात ‘FREE KASHMIR’चं पोस्टर दाखवलं’, तरुणीचा अखेर खुलासा!

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनामध्ये 'FREE KASHMIR' चे बॅनर झळकावणाऱ्या तरुणीने अखेर स्वत: एक व्हिडिओ जारी करत सत्य परिस्थिती सांगितली आहे.

free kashmir poster in protest

जेएनयूमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशभरात तरूण-तरुणी रस्त्यावर उतरल्याचं चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यामध्ये हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर देखील मोठ्या संख्येनं तरुण-तरुणी निषेध करण्यासाठी जमले होते. मात्र, त्यामध्ये ‘FREE KASHMIR’ अर्थात ‘काश्मीर स्वतंत्र करा’, असं लिहिलेलं एक पोस्टर हातात घेतलेल्या एका तरुणीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. एएनआयने हा व्हिडिओ ट्वीट देखील केला होता. ‘आंदोलनादरम्यान काश्मीरी कट्टरवादी, फुटीरतावादी देखील सहभागी झाले होते. मग नक्की हे आंदोलन कशासाठी होतं?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. भाजपनं यावर मोठं रान उठवलं होतं. मात्र, आता त्या तरुणीने स्वत: सोशल मीडियावर तिच्या खुलाशाचा व्हिडिओ पोस्ट करून वास्तव मांडलं आहे.

या व्हिडिओवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री जयंत पाटील यांच्यावर थेट तोफ डागली होती.

काय म्हणाली मेहेक?

दरम्यान, या सगळ्या वादानंतर या तरुणीनेच स्वत: एक व्हिडिओ तयार करून सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर मांडली आहे. सदर तरुणीचं नाव मेहेक मिर्झा प्रभू असं असून आपण काश्मिरी नाही, महाराष्ट्रात आणि मुंबईतच आपला जन्म झाला असल्याचं या तरुणीने व्हिडिओत म्हटलं आहे. ती पुढे म्हणते, ‘माझ्या त्या पोस्टरवरून जो वाद झाला, तो वेदनादायी आणि भिती वाटायला लावणारा आहे. खरंतर मीही तिथे हल्ल्याचा निषेध करायलाच गेले होते. तिथेच FREE KASHMIR असं लिहिलेलं हे पोस्टर मला दिसलं. काश्मीरमध्ये गेल्या ५ महिन्यांपासून इंटरनेटवर बंदी आहे. अशा बंदींपासून काश्मीरला मुक्त करा हा संदेश देण्याच्या उद्देशानेच मी ते पोस्टर हातात धरलं होतं. शिवाय माझ्या हातात गुलाबाचं फूल देखील आहे’, असं मेहेक या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. मेहेकच्या या व्हिडिओमुळे या मुद्द्यावरून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

इथे पाहा मेहेकचा संपूर्ण व्हिडिओ!

'फ्री काश्मीरचा' बोर्ड लावण्यामागचं सत्य

'फ्री काश्मीरचा' बोर्ड लावण्यामागचं सत्य

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜನವರಿ 6, 2020