नवी मुंबई एपीएमसीत तुर्कस्तानचा कांदा

७५ रुपये किलो दर

turkstan kanda

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तुर्कस्तानच्या कांद्याची आवक झाली. हा कांदा विक्रीसाठी जरी दाखल झाला असला तरी कांदा व्यापार्‍यांनी अपेक्षित उचल केली नाही. अवकाळी पावसामुळे राज्यातील कांदा उत्पादनात घट झाल्यानंतर कांद्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातही पाणी आणले होते. तुर्कस्तानचा कांदा जरी बाजारात दाखल झाला असला तरी कांदा व्यापार्‍यांनी उदासीनता दाखवल्याचे चित्र होते.

या कांद्याला किरकोळ बाजारात ७५ रुपये किलो दर मिळाला. मुंबईतील किरकोळ बाजारात हा कांदा आल्यावर यात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र दीडशेपार गेलेल्या कांद्यामुळे हवालदील झालेल्या सामान्यांना तुर्कस्तानच्या या कांद्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

तुर्कस्तानातून समुद्रमार्गाने हा कांदा नवी मुंबईत दाखल झाला असून 27 टन कांदा बुधवारी एपीएमसीत आणला गेला. या कांद्याला अपेक्षित उठाव मिळत नसला तरी येत्या काळात कांदा उचललला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बुधवारी मार्केटमध्ये कांद्याच्या ११२ गाड्या दाखल झाल्या होत्या. यातील पहिल्या क्रमांकाचा चांगल्या दर्जाचा कांदा ६५ रुपये किलो तर दुसर्‍या दर्जाचा कांदा ४० ते ६० रुपये किलोने विकला गेला.