घरमुंबईअर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच सावरकरांच्या मुद्यावरून खडाजंगी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच सावरकरांच्या मुद्यावरून खडाजंगी

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून खडाजंगी सुरू झाली आहे.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, या अधिवेशनासंदर्भात विधान भवनात कामगार सल्लागार समितीची बैठक सोमवारी पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावावरून खडाजंगी झाली. ज्या स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावरून आधीच काँग्रेस – भाजपमध्ये जुंपलेले असताना आता त्याचे पडसाद सल्लागार समितीच्या बैठकीतही उमटले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव अर्थ संकल्पीय अधिवेशात २६ फेब्रुवारी मांडण्यात यावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आणि भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, त्यांच्या या गौरव प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला असून, पाच वर्षे सत्तेत असताना भाजप झोपले होते का? असा सवाल मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान, सल्लागार समितीच्या बैठकीत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव दोन्ही सभागृहात आणून तो एकमुखाने मंजूर करावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

हे उशिरा सुचलेले शहाणपण

सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावाची जी मागणी केली ते पाहिले तर भाजपला हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी करत फक्त राजकारण करण्यासाठी भाजप हे सावरकरांचा वापर करत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तसेच, या राज्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखे अनेक थोर महापुरूष होऊन गेले पण फक्त सावरकरांचा विषय आणून राजाकारण करायचे हे भाजपचे धोरण असल्याचे म्हणत भाजप ओबीसींच्या विरोधात असल्याचे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी ओबीसींचा प्रस्ताव जर अध्यक्ष आणू शकतात, तर मग सावरकरांचा गौरव प्रस्ताव का नाही आणू शकत? हे सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य म्हणजे ओबीसी विरोधी असल्याचे दिसते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. एवढेच नाही तर शिवसेनेला डिवचण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, सत्तेत काँग्रेससोबत असलेल्या शिवसेनेने देखील काँग्रेसची री ओढत पाच वर्षे राज्यात भाजपची सत्ता होती तेव्हा भाजपने गौरव प्रस्ताव का आणला नाही? असा सवाल शिवसेना आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू उपस्थित केला.

राज्य विधीमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात २६ तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्याचा भाजपचा विचार आहे. पण दडपण असल्यामुळे जर शिवसेनेकडून वीर सावरकर यांचा गौरव कार्यक्रम रद्द करण्यात येत असेल तर हजार वेळा अशा सत्तेवर लाथ मारायला हवी.

सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

भाजपाचे मागील पाच वर्षांत राज्यात सरकार होते. त्यांना त्यावेळी सावरकर यांना भारतरत्न देण्याचा आणि गौरवाचा प्रस्ताव आणण्याचा विषय का सुचला नाही. ही भाजपाची भूल होती काय? हातून सत्ता गेल्याने भाजपाकडे आता कोणतेही विषय उरलेले नाहीत. यामुळे काही तरी राजकारण करण्यासाठी त्यांनी मुद्दाम सावरकर यांच्यावरील गौरव प्रस्ताव देण्याची मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार, मदत व पुनवर्सन मंत्री

आता राजकारण करण्यासाठी भाजप हा मुद्दा आणत आहे. पाच वर्षे सत्ता होती तेव्हा हा प्रस्ताव का आणला नाही? सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी शिवसेनेने केली होती. केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण त्यांनी अजून भारतरत्न दिला नाही.

सुनील प्रभू, शिवसेना आमदार, प्रतोद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -