Eco friendly bappa Competition
घर मुंबई "भाजपचे ट्विट महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवणारे"

“भाजपचे ट्विट महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवणारे”

Subscribe

विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका करणे हा राजकीय पक्षांचा अधिकार आहे. मात्र या टीकेतून विरोधी पक्षाच्या नेत्यांविषयी जनतेत द्वेष निर्माण होईल अशी भाषा वापरली जाणं हे चुकीचं आहे. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना सोबत घेऊन विद्वेषाचे वातावरण निवळण्याचा प्रयत्न होणे आपेक्षित असताना भारतीय जनता पक्षाकडून विरोधी नेत्यांविरोधात विखारी प्रचार होणं हे राज्याच्या संस्कृतीला नख लावण्याचा प्रकार आहे.

मुंबई – ‘भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र’च्या ट्विटर हँडलवर दोन दिवसांत दोन व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना ‘औरंग्याच्या औलादी’ संबोधून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार ट्विटर वॉर सुरु झाले आहे. भाजपकडून केले गेलेले ट्विट हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवणारे असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आणि भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या निवडक नेत्यांवर होणारी टीका यांचा पॅटर्न हा एकमेकांना पुरक असाच असल्याचे भाजपच्या ट्विटवरुन दिसत आहे. ८ जून रोजी ‘भाजपा महाराष्ट्र @BJP4Maharashtra’ या ट्विटर हँडलवरुन ‘या तर औरंग्याच्या औलादी, औरंग्याच्या औलांदींना इथे जागा नाही ‘ या शिर्षकाखाली एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे फोटो वापरण्यात आले आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये

- Advertisement -

शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यात आले आहे. आता अहमदनगरचे अहिल्यानगर केले जाणार आहे. यामुळे औरंग्याच्या औलादींना पोटशूळ उठल्याचं या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे. या व्हिडिओत औरंगजेबाचे फोटो झळकावणारे आणि शर्जिल उस्मान यांनाही दाखवण्यात आले आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांचा फोटो दाखवत ‘महाविकास आघाडीत काही औरंग्याच्या औलादी आहेत’, असं म्हणत जनताच यांना धडा शिकवेल असा उल्लेख आहे.

- Advertisement -

राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून अशाप्रकारे विरोधी पक्षांतील नेत्यांविरोधात विखारी प्रचार करुन, त्यांच्याविरोधात जनमत तयार करण्याचा हा प्रकार अतिशय खालच्या पातळीचा असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये नुकताच हिंदू-मुस्लिम तणाव पाहायला मिळाला आहे. त्याआधी अहमदनगरमध्येही असाच प्रकार समोर आला होता. या परिस्थितीत सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना सोबत घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न होणे आपेक्षित असताना भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया सेल या प्रकारांना चिथावणी देत आहेत का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या याच ट्विटर हँडलवरुन आज पुन्हा एकदा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात औरंगजेब प्रेमी राजकारणी म्हणत पुन्हा एकदा शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांना लक्ष करण्यात आले आहे. त्यासोबतच या नव्या व्हिडिओमध्ये समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांचाही फोटो भाजपच्या आयटी सेलना वापरला आहे. विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका करणे हा राजकीय पक्षांचा अधिकार आहेच. मात्र या टीकेतून त्या नेत्यांविषयी जनतेत द्वेष निर्माण होईल अशी भाषा वापरली गेली असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. यातूनच पवार आणि राऊत यांसारख्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे प्रकार घडत आहेत का, याचाही शोध घेण्याची गरज विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

चित्रा वाघ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये शुक्रवारसकाळपासून ट्विटर वॉर सुरु झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करत सर्व वाद चव्हाट्यावर मांडला आहे. अशा ट्विट आणि टीकेमुळे सामान्य कार्यकर्त्यांनाही आपण काही बोललो तर त्यात काय वावगे, असे वाटल्यास नवल वाटत नाही. ही मानसिकता सर्वच पक्षांच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हानीकारक आहे. यातून महाराष्ट्राची एकमेकांच्या विचारांचा आदर करण्याची राजकीय संस्कृती लोप पावत चालली असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

- Advertisment -