ट्रेनमध्ये बारा वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग

molestation

लोकल प्रवासादरम्यान एका चिमुरडीला अश्लिल स्पर्श करत विनयभंग करणार्‍या नराधमास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी आपल्या मामासोबत रेल्वेने प्रवास करत होती. त्यादरम्यान हा प्रकार घडला अखेर दादरमध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी दिली.

२६ नोव्हेंबरला मिरारोड येथून फिर्यादी सनेश हरीशाम कर्मावत हे आपल्या १२ वर्षांच्या भाचीसोबत चर्चगेटला जाणार्‍या लोकलमधून प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान आरोपी विराज श्रीरामजी पांडे (२८) हा लोकलमध्ये चढला आणि पीडित मुलीच्या अगदी शेजारी बसला. लोकल दादर स्थानकात पोहोचताच डब्यातील गर्दी कमी झाली या संधीचा फायदा घेवून आरोपीने पीडित मुलीला स्पर्श करायला सुरुवात केली. सुरुवातीला मुलीने दुर्लक्ष केले पण हा प्रकार वाढत चालल्याने तिने आपल्या मामाला मिठी मारून याची तक्रार दिली. हा प्रकार समजताच फिर्यादी सनेश कर्मावत यांनी आरोपीला याचा जाब विचारला पण आरोपी विराज पांडे हा त्यांच्यावरच दमदाटी करायला लागला. हा सगळा प्रकार पाहणार्‍या एका प्रवाशाने रेल्वे हेल्पलाईनवर याची माहिती दिली. त्यानुसार मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांचे पथक लोकलमध्ये चढले आणि आरोपीला ताब्यात घेतले. मुलीच्या जबाबनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.