अरूण सावरटकर
मुंबई : विलेपार्ले येथे राहणार्या एका वृद्ध महिलेसह तिच्या मोलकरणीचे हातपाय बांधून सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल चोरी करणार्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश असून या दोघांकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बाबू सिंदल आणि श्वेता लडगे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही अंधेरीतील वर्सोवा परिसरातील रहिवाशी आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींचा ताबा विलेपार्ले पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. (two arrested for robbing women by tying their hands and feet in Vileparle)
यातील वृद्ध तक्रारदार दत्ताराम डिचवळकर हे त्यांची वृद्ध आई राधाबाई आणि मोलकरीण संगीता यांच्यासोबत राहतात. ते प्रॉपटी एजंट म्हणून काम करतात. रविवारी 5 जानेवारी रोजी दुपारी ते एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. यावेळी घरात त्यांची आई आणि मोलकरीण असे दोघीच होत्या. दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या घरात दोन तरुण आले होते. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी घरात प्रवेश करुन दोघींचे हातपाय बांधले. तोंडाला सेलोटेप लावून कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि एक लाख पाच हजार रुपयांची कॅश घेऊन पलायन केले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर दत्ताराम हे दुपारी अडीच वाजता घरी आले. यावेळी त्यांना त्यांची आई आणि मोलकरणीचे हातपाय बांधून चोरट्याने घरात चोरी केल्याचे दिसून आले. ही माहिती नंतर त्यांनी विलेपार्ले पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दत्ताराम डिचवळकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अंधेरीतील वर्सोवा येथून श्वेता आणि ठाण्यातून बाबू याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही अटक करुन त्यांना पुढील कारवाईसाठी विलेपार्ले पोलिसाकडे सोपविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. बाबूविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात बोगस दस्तावेज तयार करुन पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar