मुंबई महापालिकेच्या दोन शाळा देशात सर्वोत्तम

two BMC Run Schools Feature In India’s Top 10 Government Day Schools List
मुंबई महापालिकेच्या दोन शाळा देशात सर्वोत्तम

मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याची टीका केली जात असताना नुकत्याच झालेल्या एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंगमध्ये मुंबई महापालिकेच्या दोन शाळांनी देशातील सर्वोत्तम १० शाळांमध्ये स्थान पटकावले आहे. मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी-फेस मनपा शाळेने पाचवा तर जोगेश्वरीतील मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई स्कूलने देशातून दहावा क्रमांक पटकावला आहे. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या शाळा आणि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे अभिनंदन केले आहे.

वरळी सीफेस मनपा शाळा आणि आयआयटी पवईमधील केंद्रीय विद्यालय यांना पाचवा क्रमांक विभागून देण्यात आला आहेत. तर ओरिसामधील ओरिसा आदर्श विद्यालय आणि जोगेश्वरीतील पूनम नगर मनपा या शाळांना दहावा क्रमांक विभागून देण्यात आला आहे. वरळी सीफेस मनपा शाळेने ११३६ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे.

जोगेश्वरीतील मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगरची कामगिरी उल्लेखनीय असून, गतवर्षी कोणत्याही क्रमवारीत नसलेल्या या शाळेने १०९१ गुणांसह १० क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणासाठी ऑगस्ट २०२१ मध्ये लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज शाळेमार्फत सादर करण्यात आले होते. लिंकमध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावरील दोन शाळांची निवड करण्यात आल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.