Ambernath Wall Collapse: अंबरनाथमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

two deaths for wall collapse in Ambernath
अंबरनाथमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मीननगर गॅस गोडाऊन परिसरात नगरपालिका उद्यानाची आरसीसी बांधकामाची सुरक्षा भिंत कोसळून गोविंद केसरकर (३८), प्रविण कदम (३०) या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. तर काही घरे आणि वाहनांचेही यात नुकसान झाले आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मी नगर परिसरातील गॅस गोडाऊन समोरील भागात नगरपालिकेच्या उद्यानाची आरसीसी बांधकामाची सुरक्षा भिंत उभारण्यात आली होती. मात्र बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत अचानक कोसळली आरसीसी बांधकाम असलेल्या या सुरक्षा भिंतीचे दगड आणि राडारोडा थेट खालील घरे आणि पादचारी यांच्यावर कोसळले. या घटनेत गोविंद केसरकर (३८),प्रविण कदम (३०) या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दल आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच दोन्ही नागरिकांनी मृत नागरिकांना तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. मुसळधार पावसामुळे या परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने अग्निशमन दलाला मदत कार्यात ही मोठी अडचण होत असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनवणे यांनी दिली आहे.


हेही वाचा – ठाण्यातील ‘हा’ रस्ता झाला धोकादायक; वाहतूक केली बंद