घरमुंबईकळव्यात डोंगराचा भाग कोसळून बापलेकाचा मृत्यू

कळव्यात डोंगराचा भाग कोसळून बापलेकाचा मृत्यू

Subscribe

कळवा परिसरातील अटकोनेश्वर नगरमधील आदर्श चाळीवर डोंगराचा काही भाग कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. बीरेंद्र जैस्वार (40) आणि सनी जैस्वार (10) अशी मृत बापलेकाची नावे आहेत, तर निलम जैस्वार (35) यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना कळवा येथील शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर शेजारील 20 कुटुंबांना या ठिकाणाहून हलविण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगरावरील माती भुसभुशीत झाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास आदर्शनगर चाळीतील जैस्वार या कुटुंबियांच्या घरावर डोंगराचा काही भाग कोसळल्याने ते मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास सुरुवात केली.

- Advertisement -

मातीचा ढिगार्‍याखालून रहिवाशांना बाहेर काढून तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, दोघा बापलेकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. डोंगराच्या शेजारीच आदर्शनगर चाळ आहे. डोंगराचा भाग धोकादायक बनल्याने चाळीत राहणार्‍या 20 कुटुंबियांना कळवा येथील ज्ञानगंगा शाळेत हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेमुळे डोंगराखालील झोपड्या आणि चाळींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -