Omicron Variant: चिंतेत वाढ! मुंबईतील २ जणांना ओमिक्रॉनची लागण

Two more cases of Omicron variant of coronavirus in mumbai
Omicron Variant: चिंतेत वाढ! मुंबईतील २ जणांना ओमिक्रॉनची लागण

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आता मुंबईतही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. परदेशातून मुंबईत आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून एकूण संख्या १०वर पोहोचली आहे. त्यामुळे आता राज्यातील चिंतेत वाढ झाली आहे. काल रविवारी एका दिवसांत राज्यात ७ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईत आढळलेले दोन्ही ओमिक्रॉन रुग्णांमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. ३७ वर्षीय ओमिक्रॉनबाधित पुरुष दक्षिण आफ्रिकेतील जोहांसबर्गहून २५ नोव्हेंबरला मुंबईत आला होता. तसेच त्या रुग्णासोबत राहिलेली ३६ वर्षीय महिला २५ नोव्हेंबरहून अमेरिकेहून मुंबईत आली होती. दोघांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

या दोघांनाही कोणतीही लक्षणे नाहीत. या दोन्ही रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच या दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते, त्यांनी फायझरची लस घेतली होती. या दोन्ही रुग्णांच्या ५ अति जोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

राज्यात १ नोव्हेंबारपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३४ प्रयोगशाळा नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीन सर्व जनतेला करण्यात आले आहे.


हेही वाचा – Omicronचा वाढत्या अनुषंगाने राज्यात जिनोम सिक्वेंसिंगच्या लॅब वाढणार; निर्बंध पुन्हा लादले जाणार का?; काय म्हणाले टोपे?