वरळी येथील ‘अविघ्न टॉवर’मधील लिफ्ट ट्रॉली कोसळली; २ कामगारांचा मृत्यू

वरळी येथे १५ मजली 'अविघ्न टॉवरमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास 'लिफ्ट ट्रॉली' अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : वरळी येथे १५ मजली ‘अविघ्न टॉवरमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास ‘लिफ्ट ट्रॉली’ अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. (two people died in mumbai worli elevator collapse)

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी, बी.जी.खेर मार्ग, प्रेम नगर येथे निर्माणाधिन १५ मजली ‘अविघ्न टॉवर’ मध्ये सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास इमारतीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी कामगारांनी वापरलेली ‘ट्रॉली लिफ्ट’ अचानक कोसळली. लिफ्ट ट्रॉलीवर काम करत असलेले दोघे जण सोळाव्या मजल्यावरून लिफ्टसह खाली कोसळले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारदर सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

इमारतीच्या आवारात लिफ्ट कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अवघ्या पाच दिवसांत लिफ्ट दुर्घटनेची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे इमारतींमधील विविध प्रकारच्या लिफ्टच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला आहे. या कामगारांचे नाव अद्याप अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

विक्रोळीतही लिफ्ट कोसळली

दरम्यान, विक्रोळी येथे श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह या सोसायटीची 23 माळ्यांची इमारत आहे. या सोसायटीच्या पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच पार्किंग लिफ्टचा ढाचा 23 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यावेळी चार कामगार लिफ्टचे काम करत होते. त्यावेळी यातील एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दोघांना बाहेर काढण्यात यश आले होते.


हेही वाचा – पोलीस भरती : उत्तेजक औषधे घेण्याच्या प्रकरणात वाढ, पोलीस सतर्क