अंबरनाथ मध्ये अनाथ मुलीं साठी दुमजली वसतिगृहाची भेट

माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचा पुढाकार

अंबर भरारीच्या माध्यमातून अंबरनाथ मधील साहित्याची आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे,पुस्तक प्रेमी म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने अनाथ मुलींना सर्व सोयींनी सज्ज अशी चक्क दुमजली वसतिगृहाची अनोखी भेट दिली आहे.

अंबरनाथच्या फणशी पाडा याठिकाणी डॉ. इला पॉल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अनुग्रह सेवा मंडळ संचालित अनाथालयात विविध शहरातून गाव खेडयामधून आलेली असंख्य मुले आणि मुली वास्तव्यास आहेत.ती स्थानिक विविध शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवतात.मात्र अनाथालयाची वास्तु ही तोकडी किंबहुना लहान जागेत असल्याने विशेषतः मुलींना अडचणीना सामोरे जावे लागत होते.

सात-आठ महिन्या पूर्वी एका कार्यक्रमात डॉ. इला पॉल यांनी ही मुलींची निकड सुनील चौधरी यांना सांगितली होती. मुलींच्या या निकडीला चौधरी यांनी गांभीर्याने घेऊन त्यांच्या एससीजीके फर्मच्यावतीने दुमजली सुसज्ज असे वसतिगृह उभारून वाढदिवसाची अनोखी आणि आगळी वेगळी भेट गिफ्ट म्हणून दिली. तब्बल 28 लाख रूपयांची पदरमोड करून आम्हा निराधार मुलींना वसतिगृहाच्या रुपात कायमस्वरूपी आधार दिला अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना मुलींचे डोळे पाणावले होते. यावेळी गुणवंत खिरोडिया, निखिल चौधरी, डॉ. अरविंद मोरे, साहित्यिक हेमंत गोगटे, डॉ. गणेश राठोड, निमिषा चौधरी, शिवाजी पाटील, संजीवनी काटकर, शीतल जोशी, यांच्यासह अनिता चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
‘केल्याने होत आहे रे, केलेच पाहिजे’ या म्हणीचे अनुकरण डॉ. इला पॉल करतात.आम्ही जागा अपुरी पडत असल्याने निवारा देण्यासाठी पुढाकार घेतला, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी व्यक्त केली.