घरमुंबईउबरचे मुंबईतील ऑफिस बंद, पण सेवा सुरू

उबरचे मुंबईतील ऑफिस बंद, पण सेवा सुरू

Subscribe

कोविड -19 च्या संकटामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याने, उबर या अ‍ॅपवर आधारित टॅक्सीसेवा पुरवणार्‍या कंपनीने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर 45 ऑफिसेस बंद करण्याच्या हालचालीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

उबर कंपनीचे मुंबईमध्ये कुर्ला येथे ऑफिस आहे. उबेरच्या मुंबई कार्यालयात सुमारे 25 कायमस्वरुपी कर्मचारी आणि 150 पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. कंपनीने मुंबईतील कार्यालय बंद करताना कर्मचार्‍यांना डिसेंबरपर्यंत घरातूनच काम करण्यासाठी सांगितले आहे. मात्र, कंपनीने कार्यालय बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही कर्मचारी कंपनीच्या ऑपरेशन आणि धोरणांतर्गत कंपनीत पूर्णपणे कार्य करत राहतील. कर्मचार्‍यांना पुढील वर्षी मुंबईत इतर कोणत्या कार्यालयात पाठवणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कंपनी मुंबईमध्ये आपली सेवा सुरूच ठेवणार आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात, उबरने झूम अ‍ॅपच्या माध्यमातून या कर्मचार्‍यांना व्हिडिओ कॉल करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले आर्थिक संकट टाळण्यासाठी कर्मचार्‍यांची कपात करण्यात येत असल्याचे सांगत आपल्या 14 टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले. उबरचे जगभरात 6 हजार 700 कर्मचारी आहे. जागतिक स्तरावर कंपनीने आपल्या 3 हजार 700 कर्मचार्‍यांची कपात केली आहे. यामध्ये भारतातील 600 कर्मचार्‍यांना कामावरून काढले आहे. त्याचप्रमाणे उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरॉवस्काई यांनी मे महिन्यामध्ये कर्मचार्‍यांना पत्राद्वारे जगभरातील 45 कार्यालये बंद करण्यात येणार असल्याचे सांगत सिंगापूरमधील एपीएसी कार्यालयही बंद केल्याचे कळवले होते. कंपनीने उबर इंडियाचे प्रमुख प्रदीप परमेश्वरन यांना जूनमध्ये एपीएसीचे प्रमूखही बनवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -