मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री अनंतात विलीन

uddhav thackeray bhagatsingh koshyari gathered for the last darshan of shiv sena secretary milind narvekars mother

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या आई विद्या केशव नार्वेकर यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री 11 वाजण्याचा सुमारास लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. आज (13 जुलै 2022) रोजी रात्री  8 वाजता सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिलिंद नार्वेकर यांनी आई विद्या नार्वेकर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. दरम्यान अंत्यसंस्कारापूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतले. यावेळी मिलिंद नार्वेकर यांचा मित्र परिवार, सनदी अधिकारी अनेक राजकीय नेते उपस्थित होते.

विद्या नार्वेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मिलिंद नार्वेकर यांचे सांत्वन केले. शिंदेगटात गेलेले माजी मंत्री उदय सामंत यांनीही मिलिंद नार्वेकर यांचे सांत्वन केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून विद्या नार्वेकर यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि 11 वाजण्याचा सुमारास त्याचे निधन झाले. यावेळी मिलिंद नार्वेकर आईसोबत रुग्णालयात उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा मिलिंद नार्वेकर, सून प्रा. मीरा नार्वेकर, कन्या रूपाली चाफेकर, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

माजी मंत्री उदय सामंत यांचे सांत्वनाचे ट्वीट

मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याचे समजल्यावर माजी मंत्री उदय सामंत यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या सांत्वनाचे ट्वीट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांचे आईवर अतोनात प्रेम होते, त्यांच्या जीवनात मातृप्रेमाची पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वराने द्यावी, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.