उद्धव ठाकरे पंतप्रधान…, या संजय राऊतांच्या वक्तव्यावरून मनसेचा ठाकरे गटाला टोला

mns Sandeep Deshpande slams uddhav thackeray govt on eknath shinde political crisis

मुंबई : मुंबईत पुढील काही महिन्यांत पालिका निवडणुका लागण्याची शक्यता असताना राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातील पाहायला मिळत आहेत. या सर्व घडामोडी सुरू असताना शुक्रवारी ३ मार्चला संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी अशी मनसेकडून मागणी केल्यानंतर दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. असे असताना सोमवारी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनसेने ट्विट करत खोचक टोला लगावला.

उद्धव ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न राऊतांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर “पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ पंतप्रधान कोण होईल यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे”, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगले चर्चेत आहे. या वक्तव्यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांना ट्विट करत ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे.

“भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा. पण बुरा ना मानो होली है”, “आता तुमच्याशी हिंदीतच बोलल पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार.. मज्जा आहे बाबा एका माणसाची”असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
दरम्यान, संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी मनसेचे अमेय खोपकर यांनी केल्यामुळे दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?
उद्धव ठाकरे हे देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक उत्तम चेहरा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तरच आपण एकत्र येऊ असे महाविकास आघाडीने ठरवले होते, त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार बनले. आज विरोधी पक्षाच्या मुख्य चेहऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अधिक महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केले.