2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार?; राऊतांनी स्पष्ट सांगितले…

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने एकत्र येत मोट बांधण्यास सुरूवात करणे गरजेचे असून यासाठी शिवसेना पुढाकार घेण्यास तयार असल्याचे मत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मांडले.

संजय राऊतांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे, अशी आमची इच्छा आहे, असेही राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उद्धव ठाकरे हे देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक उत्तम चेहरा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तरच आपण एकत्र येऊ असे महाविकास आघाडीने ठरवले होते, त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार बनले. आज विरोधी पक्षाच्या मुख्य चेहऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अधिक महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केले.

उद्धव ठाकरे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदासाठीचा चेहरा असतील का? या प्रश्वावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, याबाबत आताच बोलणे योग्य नाही, मात्र, राजकारणात काहीही घडू शकते. महाराष्ट्र हे मोठ राज्य असून यामध्ये उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत. पण पंतप्रधानपदासाठी या देशाचा मुख्य चेहरा कोण असेल? हे सांगण्यापेक्षा सध्या मोदी सरकारविरोधात एकत्रित येणे गरजचे आहे, असे राऊत म्हणाले. पंतप्रधानपदासाठी नंतर चेहरा ठरवता येईल, मात्र आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणे महत्वाचे आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
ऐन होळीच्या सणाला शिवसेना आणि ठाकरे गटात ठाण्यात वाद झाला. ठाण्यातील शिवाई नगर येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापसांत भिडले. शिवसेनेने शिवाई नगर शिवसेना शाखा कुलूप तोडून ताब्यात घेतली. यानंतर ठाकरे गटाकडून त्याला विरोध करण्यात आला. घोषणाबाजीही झाली. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला. ‘जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा. बघून घेऊ’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला.