घरमुंबईधनुष्यबाण चोरला, पण प्रभू श्रीराम माझ्यासोबत!

धनुष्यबाण चोरला, पण प्रभू श्रीराम माझ्यासोबत!

Subscribe

रामटेकहून पायी चालत आलेल्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांचा संवाद

धनुष्यबाण चिन्ह जरी कागदावरचे नेले असले तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहे. कार्यकर्त्यांचे हे ब्रह्मास्त्र माझ्याबरोबर आहे. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत, अशा भावना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पूर्व विदर्भातील रामटेक येथून पायी आलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना व्यक्त केल्या.

रामनवमीनिमित्त वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नागपूरमधील रामटेकहून शेकडो शिवसैनिक पायी निघाले होते. गुरुवारी ते मातोश्रीवर पोहचले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई आदी नेते उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, रामटेक ते इथपर्यंत पायी येण्यास हिंमत लागते. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. कुणीतरी कुणासाठी तरी इतके किलोमीटर पायपीट करीत येणे आताच्या काळात अशक्य आहे. तुम्हाला मातोश्रीत यावे आणि माझ्यासोबत उभे राहावे असे वाटणे हा मी रामाचा आशीर्वाद मानतो.

लोकशाही वाचवणे माझ्या एकट्याचे काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते महत्त्वाचे आहे. रामसेतू बांधताना वानरसेना तर होतीच, पण खारही होती. तेव्हा तर खारीनेही तिचा वाटा उचलला. आपण सगळे एकत्र आलो तर लंकादहन करू शकणार नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केला.

- Advertisement -

तेव्हा प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन दगड समुद्रात टाकला तर तो तरंगायचा. आता राजकारणात तेच झाले आहे. प्रभूरामाचे नाव घेऊन दगड तरंगत आहेत. तेव्हा दगडांवर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते तरंगत होते. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात. मग खर्‍या रामभक्तांनी करायचे काय, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -