Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी आव्हाडांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना वाटप केलेल्या घरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्थगिती

आव्हाडांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना वाटप केलेल्या घरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्थगिती

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग परिसरातील मूळ रहिवाशांमध्ये असुरक्षेची भावना असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या कॅन्सर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाटप केलेल्या सदनिकांना वितरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्थगिती दिली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात लालबाग परिसरातील नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे देण्यात आलेल्या या स्थगितीमुळे शिवसेना राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष उफाळण्या बरोबरच आव्हांडांच्या प्रसिध्दी पारायणाला चाप लावताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे पाऊल उचलण्यासाठी स्थानिक आमदार अजय चौधरी यांची नाराजी कारणीभूत ठरली आहे. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत उपचारादरम्यान निवासाच्या खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हाडातर्फे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याबाबतची कल्पना मांडली होती. याबाबत अवघ्या तीन दिवसांत गाळे वितरणाचा निर्णय घेणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णय प्रक्रियेमुळे लालबाग परिसरात कमालीचा संताप आहे.

लालबाग परिसरातील हाजी कासम चाळींचा पुनर्विकास करून कैलास अगरवाल या बड्या बांधकाम व्यावसायिकाने ‘अविघ्न पार्क’ ही एक अलिशान गृहसंकुलाची योजना ३३/९ अंतर्गत राबवली आहे. याच भूखंडावर मूळच्या ७५० रहिवाशांना घरे वितरीत करण्यात आली. यातील २०४ सदनिका महापालिकेसाठी तर १०४ सदनिका डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांसाठी तसेच शिरोडकर मंडईतील बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

या प्रकल्पात म्हाडाला १५० गाळे मिळाले आहेत. हे गाळे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या मास्टर लिस्टवरील रहिवाशांना वितरित करण्यात यावे, असा प्रस्ताव होता. मात्र, अनेक जुन्या भाडेकरुंनी इथे घरे घेण्यास नापसंती दाखवल्यावर चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतील म्हाडाच्या दूरवर राहणार्‍या कर्मचार्‍यांना शासकीय निवासस्थान स्वरूपात हे गाळे वितरित करण्यात यावेत, असाही प्रस्ताव होता.

MHADA Rooms For The Relatives Of Cancer Patients
१६ मे २०२१ रोजी कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना राहण्यासाठी शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या होत्या

- Advertisement -

 

प्रत्यक्षात खासदार सुप्रिया सुळे यांनी कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी निवास व्यवस्थेची संकल्पना मांडल्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगोलग म्हाडाच्या अधिकार्‍यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करायला लावला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते हे गाळे टाटा रुग्णालय व्यवस्थापनाकडे सुपूर्दही केले गेलेत. या संपूर्ण प्रकरणात परिसरातील नागरिक, स्थानिक आमदार तसेच नगरसेवक यांची कोणतीही मते विचारात न घेता ही संकल्पना आव्हाडांनी रेटून नेली.

हा भाग वर्षानुवर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथले सहाही नगरसेवक आणि आमदार हे शिवसेनेचे आहेत. आव्हाड यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या भागातील सामान्य मराठी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. कारण या ‘सुखकर्ता’ संकुलामध्ये जाण्यासाठी फक्त एकच प्रवेशद्वार असून या भागात तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी येणारी मंडळी इथल्या सार्वजनिक सोयी तसेच परिसर यांची योग्य ती काळजी न घेता कोरोना काळात अनेक समस्यांना निमंत्रण देतील अशी स्थानिक नागरिकांना भीती आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार अजय चौधरी यांच्याकडे आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर चौधरी यांनी पत्र लिहून याबाबतचा परिसरातील जनक्षोभ मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला आहे. परळ, लालबाग या परिसराबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेना हे नेहमीच संवेदनक्षम असतात. त्याच भावनेतून मुख्यमंत्र्यांनी या वितरणाला स्थगिती दिली आहे.

आमदार अजय चौधरी यांनी सोमवारी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग, विकास खरगे, गृहनिर्माण सचिव मिलिंद म्हैसकर आमदार अजय चौधरी यांच्यासह शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर यांना संयुक्तरित्या बैठक घेऊन समन्वयाने या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. त्याच वेळेला या कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाने विकसित केलेल्या भोईवाडा येथील संकुलात कशा स्वरूपात व्यवस्था करता येईल याबाबत आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘महानगर’ ला माहिती देताना सांगितले.

मुळात हा प्रस्ताव पूर्ण विचारांती आणि सर्वांना विश्वासात घेऊन करायला हवा होता. म्हाडाच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांसाठी निवास व्यवस्था करण्यासाठी हे गाळे राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, मंत्री महोदयांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर काम करण्यात आलेले गाळे टाटाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. याबाबतचे वितरण देखील टाटा तर्फे करण्यात येणार आहे; पण प्रत्यक्षात मात्र आता रहिवाशांचा विरोध झाल्यानंतर या ठिकाणी टाटाच्या कर्मचार्‍यांना निवासाची व्यवस्था करण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. ही गोष्ट गृहनिर्माण विभागाच्या अनेक अधिकार्‍यांना न रुचणारी आहे.’

राज्य सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पाच एकरचा भूखंड टाटाला दिलेला आहे. तो टाटा व्यवस्थापनाकडून धूळ खात पडल्याकडेही स्थानिक आमदारांनी लक्ष वेधले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार चौधरी म्हणाले, हाजी कासम चाळीच्या दाटीवाटीच्या परिसरातील घरे कोरोना काळात कॅन्सर रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना देणं म्हणजे हजारो निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. भोईवाडा परिसरात म्हाडाचे गाळे आहेत ते टाटा रुग्णालयापासून जवळही आहेत. तिथे ही व्यवस्था करण्याला आमचा आक्षेप नाही; पण लालबाग परिसरातील नागरिकांच्या जीवाशी आम्ही कोणालाही खेळू देणार नाही. आमचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर पूर्ण विश्वास आहे. ते लालबागवासियांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असेही चौधरी म्हणाले.

- Advertisement -