Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिवसेना-भाजपमधील अंतर कमी होणार?

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिवसेना-भाजपमधील अंतर कमी होणार?

- डोंबिवलीतील कार्यक्रमात युतीच्या आठवणींना उजाळा

Related Story

- Advertisement -

आपल्यातील कनेक्शन मजबूत असले पाहिजे. जर ते मजबूत राहिले नाही तर रवींद्र चव्हाण सारखे होते, असा टोला लगावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीतील दुरावा आणि अंतर कमी करण्यावर भर दिला असल्याचे स्पष्ट संकेत डोंबिवलीतील आजच्या कार्यक्रमादरम्यान मिळाले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप या दोन पक्षांमधील तणावपूर्वक राजकीय संबंधांबाबत मार्मिक भाष्य केले. कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची बलस्थाने म्हणून ओळखली जातात. त्यातही डोंबिवली हे संघ परिवाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. तर कल्याण शहर हे शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सध्याच्या महाआघाडी विकास सरकारमधील दोन्ही पक्षांची येथील अवस्था अत्यंत दयनीय आहे.

- Advertisement -

त्यामुळे कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तीन लोकसभेच्या जागा तसेच विधानसभेच्या 18 जागा आणि येथील महापालिकांच्या सत्ता या शिवसेना आणि भाजप यांना जर स्वतःच्या ताब्यात राखायचे असतील तर निवडणुकीपूर्वी जरी युती होऊ शकली नाही तरी निवडणुकीनंतर मात्र दोन्ही पक्षांना सत्तेचा लाभ मिळण्यासाठी एकत्र येण्या वाचून गत्यंतर राहत नाही, असा येथील राजकीय पूर्वेतिहास आहे. त्यामुळेच आजच्या डोंबिवलीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिवंडीचे खासदार व आताचे केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील आणि डोंबिवलीकर आमदार रवींद्र चव्हाण यांच्याबाबत बोलताना शिवसेना-भाजप युती असतानाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. हा उजाळा देत असताना उद्धव ठाकरे हे जसे केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्याबाबतच्या पहिल्या भेटीत रंगले होते.

त्याचप्रमाणे एकीकडे कपिल पाटील यांनी शिवसेनेशी मजबूत कनेक्शन ठेवल्याचे सांगत त्यांनी दुसरीकडे डोंबिवलीतील भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनादेखील हे कनेक्शन अधिक मजबूत करण्याचा बहुमोल सल्लाही दिला आहे. त्याचप्रमाणे राज्यात महाआघाडी विकास सरकार सत्तेवर असल्यामुळे आपल्यामध्ये राजकीय मतमतांतरे असू शकतात. मात्र, त्यावर देखील शहरातील विकासकामांसाठी भाजपला बरोबर येण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय चातुर्य दाखवल्याची चर्चादेखील आता युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे डोंबिवलीतील आजचे राजकीय भाषण हे शिवसेना-भाजपमधील अंतर कमी करण्याकडे भर देणारे होते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या या अनपेक्षित धक्का तंत्राने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोटात मात्र गोळा आला आहे.

- Advertisement -